
सामना प्रतिनिधी । नांदेड
उद्योजक सुमोहन आत्महत्या प्रकरणी उद्योजक चंद्रकांत गव्हाणेची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे.
शहरातील विद्यानगर भागात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे कंत्राटदार उद्योजक सुमोहन राममोहन कनगला यांनी स्वतःवर गोळी घालून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहली होती. त्यात त्यांनी नांदेडचे प्रसिध्द उद्योगपती चंद्रकांत गव्हाणे, हैद्राबाद येथील बाला रेड्डी, शुभंम रेड्डी आणि भुवनेश्वर, ओरिसा येथील उद्योजग गुप्ता यांना आपल्या आत्महत्येस जबाबदार ठरवले होते.
त्यानंतर, पोलिसांनी मुरलीमोहन कनगला यांच्या तक्रारीवरुन सुसाईट नोटमध्ये नावे लिहिलेल्या चार जणांविरुध्द आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे या सदराखाली गुन्हा दाखल केला.
त्यानंतर नांदेडचे उद्योगपती चंद्रकांत यादवराव गव्हाणे (६३) यांना अटक करण्यात आली. १२ ते १६ जुलै या चार दिवसांची त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी चंद्रकांत गव्हाणे यांना न्यायालयात हजर करुन वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. सरकारी वकील अॅड.गिरीष मोरे यांनी पोलीस कोठडी वाढवून देणे का आवश्यक आहे यासाठी सविस्तर मुद्दे मांडले. चंद्रकांत गव्हाणे यांच्या वतीने काम करणारे अॅड. शिरीष नागापूरकर यांनीही पोलीस कोठडी देण्याची गरज नाही असा मुद्दा मांडला होता. पण न्यायाधीश एन.एल.गायकवाड यांनी चंद्रकांत गव्हाणे यांची पोलीस कोठडी दोन दिवस वाढवून दिली आहे.




























































