
नागरिकता सुधारणा विधेयक लोकसभेत सोमवारी रात्री उशीरा मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी आता ते राज्यसभेत मंजूर होणे गरजेचे आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी समुदायाला नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे. मात्र, मुस्लीम समुदायाचा यात समावेश नाही. त्यामुळे या विधेयकाला विरोध होत असून अनेक नागरिकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते आणि माजी सनदी अधिकारी हर्ष मंदर यांनीही या विधेयकाला विरोध केला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास आपण मुस्लीम धर्म स्वीकारू, असे त्यांनी म्हटले आहे.
हे विधेयक मंजूर झाल्यास आपण अधिकृतपणे मुस्लीम धर्म स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एनआरसीसाठी आपण कोणतेही दस्तावेज सादर करणार नाही. दस्तावेज नसलेल्या मुस्लीमांना जी शिक्षा देण्यात येईल, तीच शिक्षा आपल्यालाही देण्यात यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचेही ते म्हणाले. मुस्लीम धर्म स्वीकारण्याबाबत आणि एनआरसीसाठी दस्तावेज सादर करणार नसल्याचे हर्ष मंदर यांचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांचे हे ट्विट 8 तासात सुमारे 4 हजारपेक्षा जास्तवेळा रिट्विट करण्यात आले आहे. तर त्यांच्या या ट्विटचा अनेकांनी निषेधही केला आहे. या विधेयकामुळे फाळणीच्या आठवणी पुन्हा उफाळून येणार असून देशातील समस्यांमध्ये वाढ होणार असल्याचे ते म्हणाले. भाजपा फक्त मुस्लीम धर्मियांसाठी एनआरसी आणत आहे, तर इतर धर्मियांना नागरिक सुधारणा विधेयकातून संरक्षण देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.





























































