डीएम न्यूरोलॉजी अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द; जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर हायकोर्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरेट ऑफ मेडिसिन अर्थात डीएम न्यूरोलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेश रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध निवासी डॉक्टरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त जागा भरण्याच्या रुग्णालयाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने बुधवारी याचिकेची दखल घेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग व जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली.

जे.जे. रुग्णालयामध्ये डीएम न्यूरोलॉजी अभ्यासक्रमासाठी गतवर्षी प्रवेश घेतलेल्या निवासी डॉक्टरांनी ॲड. कल्पना कान्हेरे व ॲड. जिवतेश्वर सिंह यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जे. जे. रुग्णालयाकडून चूक झाली म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने थेट चालू शैक्षणिक वर्षातील सर्व प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे, याकडे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग व जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली आणि याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी 2 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

याचिकेत नेमके काय म्हटलेय?

– जे. जे. रुग्णालयातील डीएम न्यूरोलॉजीच्या अभ्यासक्रमासाठी दोन जागा मंजूर असताना गतवर्षी रुग्णालय प्रशासनाने समुपदेशनासाठी सीट मॅट्रिक्स भरताना दोनऐवजी तीन जागा नमूद केल्या होत्या. परिणामी, अभ्यासक्रमासाठी तीन डॉक्टरांना प्रवेश मिळाले. रुग्णालय प्रशासनाच्या या चुकीमुळे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने रुग्णालयातील संबंधित अभ्यासक्रमाच्या जागांवर गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेले प्रवेश रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.

– जे.जे. रुग्णालयाने गतवर्षी दिलेल्या अतिरिक्त प्रवेशाबद्दल राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने यंदा एक जागा रद्द करणे क्रमपात्र होते. मात्र तसे न करता आयोगाने दोन्ही जागा रद्द केल्या. हा निर्णय मार्गदर्शक तत्त्वांच्या आणि संविधानाच्या विरुद्ध आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी किमान एक जागा देण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून केली आहे.

रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

जे.जे. रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभाग हा सर्वात जुना विभाग आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याच्या आयोगाच्या निर्णयामुळे जे. जे. रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासेल आणि सध्या कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांवर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडेल. तसेच रुग्णसेवेवर विपरित परिणाम होईल, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे.