चोरीच्या हेतूने वृद्ध जोडप्यावर केअर टेकरने चाकू हल्ला केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात घडली. सुधीर चिपळूणकर असे मृताचे नाव आहे, तर सुप्रिया या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हत्येनंतर पळून गेलेल्या पप्पू गवळीला काही तासांत मेघवाडी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सुधीर हे पत्नी सुप्रियासोबत मेघवाडीच्या समर्थनगर येथे राहत होते. पंधरा दिवसांपूर्वी एका एजन्सीच्या माध्यमातून पप्पू हा चिपळूणकर यांच्या घरी कामाला राहिला होता. तो सुधीर यांच्यासोबत पैसे काढण्यासाठी बँकेत जायचा. तसेच सुधीर यांना सकाळी वॉकिंगलादेखील नेत असायचा. सुधीर यांच्या खात्यात पैसे असल्याचे पप्पूच्या लक्षात आले. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने गेल्या आठवडय़ात कट रचला. सोमवारी सायंकाळी सुप्रिया या हॉलमध्ये बसल्या होत्या, तर सुधीर हे बेडरूममध्ये झोपले होते. तेव्हा पप्पूने किचनमधील चाकूने सुप्रिया यांच्या गळय़ावर वार केले. सुप्रिया यांनी आरडाओरड केल्यावर सुधीर हे बाहेर आले. सुधीर यांनी पप्पूशी दोन हात केले तेव्हा पप्पूने सुधीर यांच्या छातीत चाकू मारला. जखमी अवस्थेत सुप्रिया या किचनजवळ गेल्या.
गळय़ातून रक्त येत असतानाही त्यांनी किचनमधून दोन वाटय़ा खाली टाकल्या. सायंकाळी सोसायटीमध्ये मुले खेळत होती. मुलांना रक्त लागलेली वाटी दिसली. त्यानंतर मुले ही दुसऱया मजल्यावर धावत गेली. मुले वर आल्यावर पप्पू हा चकवा देऊन खाली पळाला. मुलांनी याची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱयांना दिली. पदाधिकाऱयाने याची माहिती मेघवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी सुधीर यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येनंतर पळून गेलेल्या पप्पूच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. परिमंडळ 10चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मांढरे, पोलीस निरीक्षक वैभव माळी आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासासाठी पाच पथके तयार केली. पप्पू हा दादर येथून सोलापूरला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी पप्पूला दादर येथून ताब्यात घेऊन अटक केली.
हत्येनंतर नातेवाईकांकडून घेतले पाचशे रुपये
सुधीरची हत्या केल्यानंतर पप्पू हा इमारतीखाली आला. आपले काम झाले असे सांगून तो इमारतीबाहेर आला. इमारतीबाहेर आल्यावर तो पळून गेला. त्याने त्याच्या एका व्यक्तीच्या मोबाईलवरून नातेवाईकाला फोन केला. नातेवाईकांनी पाचशे रुपये दिल्यावर पप्पू हा त्या पैशाची दारू प्यायला.
























































