
मी वाघाची शिकार केली आणि त्याचा दात गळय़ात घातला, अशी बढाई मारणारे मिंधे गटाचे खोकेखोर आमदार संजय गायकवाड चांगलेच गोत्यात आले आहेत. गायकवाड यांच्याविरुद्ध वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत गळय़ातील ‘दात’ जप्त केला. हा कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याच्या भीतीने गायकवाड यांचे धाबे दणाणले आहेत.
बुलढाणा येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचा जबाबही नोंदवला आहे.
19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय गायकवाड हजर राहिले होते. डोक्यावर फेटा, गळय़ात मोत्यांच्या माळा आणि हातात तलवार असा त्यांचा पेहराव होता. यावेळी स्वतःचे प्रताप सांगताना त्यांनी 1987 मध्ये वाघाची शिकार केल्याचे विधान केले. मी एका वाघाची शिकार केली व त्याचा दात काढून गळय़ात घातला, असे जाहीर विधान गायकवाड यांनी केले. त्यावर त्यांना ‘तो’ वाघ होता की बिबटय़ा? असा प्रश्न करण्यात आला. त्याला उत्तर देतानाही त्यांनी ‘बडेजाव’ केला आणि ‘वाघाची शिकार केली होती. बिबटय़ा वगैरेंना तर मी असंच पळवून लावत होतो,’ असे सांगितले. या विधानानंतर वन विभागाने तातडीने कारवाईचे उचलले आहे. त्यामुळे गायकवाड यांना त्यांचे विधान चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत.
दाताची डीएनए चाचणी करणार
वन विभागाने संजय गायकवाड यांच्या गळय़ातील दात तातडीने जप्त केला. हा दात डीएनए चाचणीसाठी डेहराडूनच्या ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट’मध्ये पाठवला जाणार आहे. त्या चाचणीत जर ‘तो’ दात वाघाचाच असल्याचे सिद्ध झाले, तर गायकवाड यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये वाघ व इतर वन्यजीवांचे दात, नखे आदी अवयव वापरणे गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, असे वन विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.





















































