
एकीकडे ग्रामपंचातीच्या निवडणुकीचीच रणधुमाळी चालू असतानाच उदगीरात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्यासह आणखी 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उदगीर बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे यांना सध्या होऊ घातलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणातून दूर ठेवण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांचा परस्पर काटा काढण्याचा कट रचून तत्कालीन सभापती सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्यासह 7 साथीदारांनी मिळून माजी सभापती शिवाजीराव हुडे यांच्याविरोधात फसवणुकीचे कृत्य केल्यावरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यामध्ये शिवाजीराव हुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 7 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शिवाजी हुडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील व सचिव व इतरांनी 2019-2020 साली माझ्या नावाने परवान्याची मागणी केलेली नसताना माझ्या बोगस सह्या करून मे.एस.एच. हुडे या फर्मचे नुतनीकरण माझ्या नावे बेकायदेशीरपणे केलेले आहे. सभापती व सचिव यांनी माझ्या राजकीय प्रवास संपवण्यासाठी व बाजार समिती मिळवण्यासाठी हा बेकायदेशीर प्रकार केलेला आहे. हुडे सन 2012-2016 मध्ये सदर बाजार समितीमध्ये शेतकरी मतदार संघातून निवडून येऊन सभापती होते. तरीपण या फसव्या सभापती व सचिवाने शिवाजी हुडे यांच्या फर्मचा बेकायदेशीर परवाना काढला. याबाबत समितीकडे परवाना नुतनीकरणचे कागदपत्र मागणी केली. त्या कागदपत्राची तपासणी केल्यास असे दिसले की, सन 2019-20 च्या नुतनीकरण अर्ज नाही व सन 2020-21 च्या नुतनीकरण अर्जावर सहीच नाही. तसेच 2021-22 चा नुतनीकरण अर्जच नाही व 2022-23 च्या मागणी अर्जावर बोगस सह्या करून परवाना नुतनीकरण दिसून आले असल्याची तक्रार शिवाजीराव हुडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील, उपसभापती रामराव बिरादार, सचिव भगवान पाटील, अनुमोदक, मोहन गडीकर, तत्कालीन सचिव एन.डी. हंगरगे, परवाना विभागाचे कर्मचारी डी.एम. माने, अजय बिरादार, दिनकर कांबळे अशा एकूण आठजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























































