
श्रीरामपूर तालुक्यातील राहुरी येथील येवले आखाड्यावरील 27 वर्षांच्या नवविवाहित महिलेचा छळ करून तिच्यावर जादूटोणा केल्याच्या आरोपावरून महिलेचा पती. मांत्रिकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तू अपशकुनी व पांढऱ्या पायाची आहेस, तुझ्यामुळे सासूचा मृत्यू झाला, असे आरोप करत 27 वर्षांच्या नवविवाहित तरुणीचा छळ करण्यात आला. तसेच घरातून निघून जाण्यासाठी तिच्यावर जादूटोणा करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील डॉक्टर पती व मांत्रिकासह सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून श्रीरामपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणी अश्विनी लवांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. पती डॉ. विकास विश्वनाथ लवांडे, सासरा विश्वनाथ रखमाजी लवांडे, नणंद पुनम विश्वनाथ लवांडे (तिघे रा. कारेगाव) तसेच मामेसासरा किशोर सीताराम दौड, मामीसासू प्रमिला किशोर दौड (दोघे रा. मातापूर ता. श्रीरामपूर) आणि जादूटोणा करणारा मांत्रीक अशा सहा जणांवर पोलिसांनी अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
12 फेब्रुवारी 2020 रोजी अश्विनीचा विवाह डॉ. विकास विश्वनाथ लवांडे (रा. कारेगाव ता. श्रीरामपूर) यांच्यासोबत झाला. अश्विनी सासरी नांदत असताना तिच्या सासूचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या सासरच्यांनी तू अपशकुनी आहेस पांढऱ्या पायाची आहेस. तू घरातआल्यामुळेच तुझ्या सासूचा मृत्यू झाला, असे आरोप करत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या सासरच्या लोकांनी एका मांत्रिकाला बोलावून अश्विनीवर जादूटोण्याचे अघोरी प्रकार सुरू केले. तिच्या डोक्यावर लिंबू कापून, डोक्याचे केस उपटून, अंगावरील कपडे कापून ते काळ्या बाहुलीला चिटकविणे, अमावस्येच्या रात्री 11 वाजेनंतर राखेचे गोल रिंगण करुन त्यात अश्विनीला बसवून मंत्रोच्चार करणे असे प्रकार करण्यात आले. तू उपचार करून घेतले नाहीस तर वाईट प्रकार घडत राहतील, अशी सासरच्यांनी तिला धमकी दिली. माहेरच्यांना त्रास नको म्हणून तिने याबाबत कोणाला सागितले नाही.
अश्विनीच्या वडिलांनी तिच्याकडे 16 जून रोजी काळी बाहुली, लिंबू, तावीत पहिले. त्यांनी याबाबत तिला विचारले असता सर्व प्रकार उघडकीस आला. तिच्या वडिलांनी तात्काळ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे पदाधिकारी महेश धनवटे यांना हा प्रकार सांगितला. अश्विनीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अश्विनीचा पती, मांत्रिकांसह सहा जणावंर गुन्हा दाखल केला आहे.




























































