
हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गांधी कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी विरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशाप्रकारे व्यक्तव्य केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस संगीता तिवारी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री पायल रोहतगी हिने पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गांधी कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओत रोहतगी हिने ट्रिपल तलाक कायद्याला काँग्रेस कुटुंब पूर्णतः विरोध करीत आहेत, असे म्हटले. त्याशिवाय तिने गांधी कुटुंबियांसह अनेकांविरूद्ध आक्षेपार्ह विधान केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी तक्रार दिली होती.
रोहतगीने अॅपचा वापर करुन एक व्हिडीओ बनवून राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी चुकीचे विधान केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ससमाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी संबंधित अभिनेत्री विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तपास अधिकारी यु. के. माने यांनी दिली आहे.
”अभिनेत्री पायल रोहतगी हिने देशाचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहलाल नेहरू यांच्यासह गांधी कुटुंबियांबद्दल अतिशय खालच्या शब्दात वक्त्यव्य केले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. चौकशीनंतर संबंधित अभिनेत्रीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
– संगीता तिवारी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस

























































