एसआयआर ड्युटीला दांडी, 14 शिक्षकांविरोधात गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशेष मतदारयादी सुधारणा (एसआयआर) मोहिमेसाठी नियुक्त करण्यात येऊनही सरकारी आदेशाचे उल्लंघन करून डय़ुटीवर गैरहजर राहणाऱ्या 14 शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील बोरिवली, दहिसर आणि मालाड परिसरातील शैक्षणिक संस्थामधील या शिक्षकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

एसआयआर मोहिमेतील कार्यरत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱयांच्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग आणि दहिसर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोरिवली पूर्वेतील एका शाळेतील सहा सहाय्यक शिक्षकांची बूथ लेवल ऑफिसर (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर बोरिवली पूर्वेतील एक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सात सहाय्यक शिक्षकांची बीएलओ म्हणून निवड करण्यात आली होती.

तर मालाडमधील महापालिकेतील शाळेतील एका शिक्षिकेची बीएलओ म्हणून निवड करण्यात आली होती. अशी एकूण 14 शिक्षकांना वारंवार समन्स आणि सूचना देऊनही हे शिक्षक ड्युटीवर हजर झाले नाहीत. त्यामुळे या सर्व शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सहा टप्प्यांत राबविला जाणार आहे.