
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. अनिल देशमुख यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या धाडी सुरूच आहेत. सीबीआयने आज सकाळी त्यांच्या नागपूर व मुंबईतील घरावर पुन्हा धाड टाकली. दरम्यान, अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख आणि सुनेविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र सीबीआयने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ईडीने हतबल होऊन न्यायालयात देशमुख चौकशीला हजर राहत नसल्याने त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स जारी करून ईडीच्या चौकशीसाठी का हजर राहत नाही, याबाबत विचारणा केली होती, मात्र अद्यापही अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागलेला नाही.


























































