
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेचा निकाल 20 जुलै रोजी, तर बारावी परीक्षेचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर केला जाणार आहे. बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युलाही सीबीएसईने आज सर्वेच्च न्यायालयात सादर केला. दहावी, अकरावी आणि बारावीचे अनुक्रमे 30ः30ः40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या बारावी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा 1 जून रोजी करण्यात आली होती. परीक्षा रद्द झाल्याने बारावीचा निकाल कसा लावणार आणि मूल्यमापन कसे केले जाणार अशी चर्चा सुरू होती. सीबीएसईने बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला आज न्यायमुर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर सादर केला. बारावीचा निकाल बनवताना तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. फॉर्म्युला पुढीलप्रमाणे असणार आहे.
निकाल मान्य नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी
ज्या विद्यार्थ्यांना या फॉर्म्युल्याच्या आधारे बनवण्यात आलेले निकाल मान्य नसतील त्यांना कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर परीक्षा देण्याची संधी दिली जाईल असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
- दहावीमधील विद्यार्थ्याच्या कामगिरीवर 30 टक्के गुण दिले जाणार असून त्यात पाचपैकी सर्वाधिक गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. या विषयांच्या गुणांची बेरीज करून त्याचे 30 टक्के काढले जातील.
- n अकरावीच्या अंतिम परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांचे 30 टक्के गुण दिले जातील.
- n बारावी इयत्तेत घेतलेल्या सत्र, चाचणी आणि प्रिलिम्स परीक्षेतील गुणांची बेरीज करून त्याचे 40 टक्के होतील तितके गुण दिले जातील.
























































