शिवसेनाभवनाबाहेर जल्लोष, ढोल-ताशांचा गजर; मिठाई वाटून निर्णयाचे स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सर्व फोटो - आशिष राजे

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला. यानंतर देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण असून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मुंबईमध्ये शिवसेनाभवनाबाहेर शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या निर्णयानंतर जल्लोष साजरा केला. यावेळी ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये तिरंगा आणि भगवा झेंडा फडकावण्यात आला. तसेच पेढे, लाडू, मिठाई वाटून शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘शिवसेना झिंदाबाद’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया यावेळी उमटत होती.

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे देशाचा पोलादीपणा कायम असल्याचे दिसून आले आहे. हा धाडसी निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. या निर्णयामुळे आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन या निर्णयाला पाठिंबा देण्याचे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.