सेलेब्रिटी चॉइस – अनेक गोष्टींचा वेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिराम भडकमकर

वाचन हा कामासाठीचा, माझ्या क्षेत्रासाठी निगडित भाग आहेच, पण याबरोबरच आवडीचाही आहे. त्यामुळेच सतत वेगवेगळे विषय हाताळलेली पुस्तपं वाचायला खूप आवडतं. मग ती पुस्तपं कोणत्या नामवंत लेखकाची वा आवडीच्या विषयाची असायलाच हवीत असं नाही. सध्या मी वाचत असलेली पुस्तपं अशाच प्रकारची आहेत. श्रीराम पच्छिंद्रे यांचं ‘डोळे आणि दृष्टी’ नावाचं पुस्तक प्रासंगिक घटनांवर भाष्य करतं. प्रासंगिकतेच्या पलीकडे जाणारा हा लेखसंग्रह आहे. समाजातल्या एकूण सगळ्या घटनांवर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. पुढच्या आणि मागच्या काही दशकांचा दस्तावेज म्हणून हे पुस्तक ठसठशीतपणे आपल्यासमोर येतं. तात्कालिक घटनेबाबत लिहिताना त्यांनी त्याबाबत केलेलं भाष्य मात्र तात्कालिक नाही. त्याच्या पलीकडे जात अनेक गोष्टींचा वेध घ्यायला लावणारं हे लेखन आहे.

दुसरं आवडलेलं पुस्तक म्हणजे श्रीपाद प्रभाकर जोशी यांचा ‘चोरकप्पा’ नावाचा काव्यसंग्रह. आजकाल क्वचित कवी आणि कविता प्रकार मला भावतात. मात्र यात त्यांनी कवितेचे अनेक प्रकार, प्र्रयोग हाताळले आहेत असं म्हणावं लागेल. लयबद्ध आणि मुक्तछंद हे दोन्ही प्रकार त्यांच्या कवितेत दिसून येतात. साध्या साध्या तरल विषयांपासून समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांचा वेध घेणारा असा हा काव्यसंग्रह आहे. याबरोबरच अगदी आताच वाचून संपवलेला सुनील गोडसे यांचा कथासंग्रह ‘एकूण एक’. यातल्या बहुतांश कथा या कॉर्पोरेट क्षेत्रातील आहेत. ह. मो. मराठे यांनी इंडस्ट्रिलायझेशनबाबत खूप सूक्ष्मरीत्या टिपलं होतं. त्यानंतर अशाच पद्धतीने कॉर्पोरेट जग उभं करणारा या मालिकेतील हा कथासंग्रह विशेष असाच आहे. कॉर्पोरेट जगातील सगळं काही जसंच्या तसं यात टिपलं आहे. नेहमीच्या वाचनात वेगवेगळे विषय धुंडाळताना अशी काही पुस्तकं हातास लागतात.

मात्र याबरोबरच काही लेखकांची पुस्तकं कायम आवर्जून वाचावीत अशी असतात. यातील माझे आवडते लेखक म्हणजे जी. ए. कुलकर्णी. जीएंचं कोणतंही पुस्तक कधीही उघडावं आणि वाचावं, त्यातलं गूढगर्भ सगळं काही आपल्यासमोर पुन्हा फेर धरून उभं राहतं. जीए एकूणच तुमचं जगणं आणि जग याबद्दलची समज वाढवतात. त्यांचं ‘पिंगळावेळ’ हे अत्यंत आवडतं पुस्तक. त्यांची ‘यात्रिक’ ही कथा खूप आवडते मला. तसंच मला चिं. वि. जोशी यांची पुस्तपं वाचायला खूप आवडतात. असं वाटतं की, त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने मानवी प्रवृत्ती टिपून त्या आपल्यासमोर मांडल्या आहेत. त्यावर त्यांनी विनोदाच्या माध्यमातून केलेलं भाष्य नक्कीच आपल्यालाही खूप काही देतं. आपली समज वाढवतं. असेच आवडीचे लेखक म्हणजे एस. एल. भैरप्पा. त्यांचं कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं की, ते वाचून पूर्ण झाल्याशिवाय सोडवत नाही. इतकी ती आपल्याला गुंगवून ठेवतात. पुस्तकं कायम आपली सोबत करत असतात. जगणं शिकवतात असं मला कायम वाटतं.

शब्दांकन : शुभांगी बागडे