
अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपूर
शासकीय कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटची खुल्या बाजारात अवैध विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील घुग्घुसमधील एसीसी सिमेंट कंपनीच्या कंत्राटदारांकडूनच हा काळाबाजार केला जात आहे. कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून एका राष्ट्रीय पक्षाच्या शहाराध्यक्षाचाही यात हात असल्याची चर्चा आहे.
सोमवारी रात्री घुग्घुस पोलिसांनी अमराई वॉर्डात कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी एका घरून एसीसी कंपनीची ५० किलोंची ४४ पोती जप्त करण्यात आली. यामध्ये कलिम खान याला ताब्यात घेण्यात आले. तो पूर्वी एसीसी कंपनीतील सिराज कंपनीत सुपरवायझर या पदावर काम करत होता. सिराजने हे सिमेंट एसीसी कंपनीतील एका कंत्राटदाराकडून घेतले असे प्राथमिक माहितीतून समोर आले. हा कंत्राटदार एका राजकीय पक्षाचा नेता असल्याची चर्चा आहे. एसीसी सिमेंट कंपनीच्या माध्यमातून शासकीय कामांकरता कंत्राटदारांना सिमेंट दिले जाते. जे फक्त याच कामासाठी वापरणे आवश्यक आहे. मात्र, या सिमेंटचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे. कंपनीतील काही अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने हे सुरू आहे. काल रात्री केलेल्या कारवाईत काही अधिकारी आणि राजकीय पक्षातील नेत्यांचे नावे समोर आल्याने चौकशीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. या प्रकरणी कंपनीचे सुरक्षा अधिकारी जोगेंदर सिंग यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले.
याबाबत ठाणेदार सत्यजित आमले यांच्याशी संपर्क केला असता कारवाई सुरू आहे. मात्र, अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या कंपनीतून अवैधरित्या सिमेंट विकले जाते. मात्र, कंपनीकडून अद्याप कुठलीही तक्रार नोंदवण्यात आली नाही. याबाबत कंपनीचे एचआर कर्नल रविंद्र रूपकुला आणि वरिष्ठ अधिकारी विवेक शर्मा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.































































