
राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) अद्ययावत करणे आणि जनगणना- 2021 च्या प्रक्रियेचा पहिला टप्पा कोरोना संकटामुळे स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सुमारे वर्षभराचा विलंब होण्याची शक्यता आहे. देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने या प्रक्रियेचा पहिला टप्पा स्थगित करण्यात आला आहे. तसेच याचे काम पुढे ढकलण्यात आले आहे.
हिंदुस्थानातील जनगणना जगातील लोकसंख्या मोजणीची मोठी प्रक्रिया आहे. जनगणनेसाठी 30 लाखांपेक्षा जास्त अधिकारी देशातील विविध गावातील घराघरांचा दौरा करून माहिती एकत्र करतात. सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या संकटाच्या काळात जनगणना तातडीने करणे गरजेचे नाही. या प्रक्रियेत एका वर्षाचा विलंब झाला तरी काहीही नुकसान होणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. जनगणना 2021 आणि एनपीआर अद्ययावत करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, 2020 या वर्षात कोरोनाच्या प्रकोपामुळे या कामातील पहिल्या टप्प्याला स्थिगिती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया देशभरात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान होणार होती.
जनगणना आणि एनपीआर अद्यायावत करणे प्राधान्य क्रमावर नाही. सध्याच्या काळात कोरोना संकटाचा मुकाबला करत त्यावर मात करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. देशात अजूनही कोरोना उद्रेकाचा धोका आहे. त्यामुळे जनगणनेचा पहिला टप्पा स्थगित करण्यात आला आहे. लॉकडाऊन जारी होण्याआधी एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी तयारी करण्यात येत होती. या टप्प्यासाठी सर्व तयारी झाली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रक्रियेचा पहिला टप्पा स्थगित करण्यात आला आहे.



























































