
अमेरिका-इराणमध्ये सध्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असली तरी दोन्ही देशांसह होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तणावाचे वातावरण आहे. या तणावपूर्ण वातावरणामुळे कच्च्या तेलाच्या जहाजांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सतर्कतेचा भाग म्हणून नियमित साठय़ाच्या व्यतिरिक्त किमान 30 दिवसांची मागणी पूर्ण होईल एवढा एलपीजी साठा तयार करण्याचे आदेश तेल कंपन्यांना दिले आहेत.
अमेरिका-इराणमधील युद्धाला तीन महिने पूर्ण होऊनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. यामुळे अमेरिका- इराणसह होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाचे वातावरण आहे. या तणावामुळे जलमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गॅस, कच्च्या तेलासह इंधनाचा साठा वाहतूक करणारी विविध देशांतील जहाजे या सामुद्रीधुनीत अडकवून पडली आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाच्या साठय़ांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने 30 दिवसांची मागणी पूर्ण करेल एवढा अतिरिक्त एलपीजी साठा तयार करण्याच्या सूचना इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियमसह अन्य सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन करणाऱया कंपन्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
























































