
हिंदुस्थान सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शवली आहे. केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्डस् लिमिटेडला प्रोजेक्ट 75 इंडियाअंतर्गत 70 हजार कोटी रुपयांच्या सहा पाणबुड्यांच्या खरेदीसाठी बोलणी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच सरकार इस्रायली रॅम्पेज एअर-टू-ग्राऊंड क्षेपणास्त्रांचा मोठा साठा खरेदी करणार आहे. यामुळे हिंदी महासागरात हिंदुस्थानची ताकद कैकपटीने वाढणार आहे.
केंद्र सरकारने 70 हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्ट-75 इंडियाला अखेर मान्यता दिली आहे. याअंतर्गत हिंदुस्थान आणि जर्मनी संयुक्तपणे सहा प्राणघातक पाणबुड्या बांधतील. संरक्षण मंत्रालयाने जानेवारीमध्ये जर्मन कंपनी थायसेनक्रुप मरीन सिस्टम्ससह एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन सिस्टमसह सहा पाणबुड्या बांधण्यासाठी माझगाव डॉकयार्डची भागीदार म्हणून निवड केली होती. संरक्षण मंत्रालय आणि एमडीएल यांच्यात या महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेतला.
इस्रायली क्षेपणास्त्रांचा साठा खरेदी करणार
हिंदुस्थान सरकार इस्रायली रॅम्पेज हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा खरेदी करणार आहे. पाकिस्तानातील मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी मुख्यालयांवरील अचूक हल्ल्यात रॅम्पेजचा वापर करण्यात आला होता. पारंपरिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या जास्त काळ पाण्याखाली राहू शकत नाहीत. त्यांना काही दिवसांनी पृष्ठभागावर यावे लागते आणि बॅटरी चार्ज कराव्या लागतात. जेव्हा त्या पृष्ठभागावर येतात तेव्हा त्या शत्रूच्या रडारवर सहजपणे येऊ शकतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी, एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्रणाली विकसित करण्यात आली. एआयपी प्रणालीने सुसज्ज असलेल्या पाणबुड्या 3 आठवडे पाण्याखाली राहू शकतात.