अपघातामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदरदरम्यान आज सकाळी रूळ ओलांडणाऱया एका प्रवाशाला लोकलची धडक बसली. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱया जलद गाडय़ांची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सीएसएमटी-मस्जिद बंदरदरम्यान सकाळी पावणेसातच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडत असताना एका प्रवाशाला सीएसएमटीहून येणाऱया लोकलने धडक दिली. यामध्ये सदर प्रवाशाचा मृत्यू झाल्याने लोकल गाडय़ांची वाहतूक थांबली होती. या घटनेची माहिती मोटरमनने दिल्यानंतर स्टेशनमास्टर आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशाला लोकलखालून काढले. त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. जवळपास अर्धा तासाच्या या खोळंब्यामुळे सीएसटीएमहून येणाऱया लोकल खोळंबल्या होत्या. तसेच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.