मध्य रेल्वेला एसी गाड्या वाढवायच्यात, पण डबे मिळेनात; आयसीएफकडून वंदे भारतच्या निर्मितीला प्राधान्य दिल्याचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वंदे भारत या बहुचर्चित सुपरफास्ट ट्रेनमुळे मध्य रेल्वेच्या एसी लोकलचे बारा वाजले आहेत. उन्हाळय़ाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल वाढवण्यासाठी प्रशासनाने नव्या एसी लोकलची चेन्नई येथील इंटेग्रल कोच फॅक्टरीकडे (आयसीएफ) मागणी नोंदवली आहे, मात्र आयसीएफकडून वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे एसी लोकलचे तूर्तास अतिरिक्त डबे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही मध्य रेल्वेला या उन्हाळय़ात एसी लोकलची संख्या वाढवणे शक्य होणार नाही.

मध्य रेल्वेकडून दररोज सुमारे 1800 गाडय़ा चालवल्या जातात. त्यामध्ये उपनगरीय लोकलची संख्या मोठी आहे. लोकल प्रवाशांनी गारेगार प्रवास करता यावा म्हणून पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेकडूनही सध्या चार एसी लोकलच्या माध्यमातून 56 फेऱया चालवल्या जातात. एसी लोकलला दिवसेंदिवस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवाशांकडून फेऱया वाढवण्याची मागणी होत आहे. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने एसी लोकलच्या वाढीव डब्यांची मागणी आयसीएफ कोच फॅक्टरीकडे नोंदवली आहे, मात्र पेंद्र सरकारने येत्या काळात देशात 400 वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे आयसीएफने एसी लोकलच्या डब्यांची निर्मिती थांबवली आहे. त्याचा फटका मध्य रेल्वेच्या एसी लोकलला बसला असून जोपर्यंत नवे डबे येत नाहीत तोपर्यंत गाड्यांची संख्या वाढवणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

भाडय़ात कपात नाही
एसी लोकलच्या तिकिटाचे दर फर्स्ट क्लासपेक्षाही जास्त आहेत. त्यामुळे त्यामध्ये कपात करावी अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे, मात्र मध्य रेल्वेकडून एसी लोकलच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नसल्याची माहिती रजनीश गोयल यांनी दिली.