नियमांचा वैताग आणि बेफिकिरीमुळेच महाराष्ट्रात कोरोना बळावतोय, केंद्रीय पथकाने व्यक्त केली तीव्र चिंता

महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या फैलावाला नागरिकांचा निष्काळजीपणाच जबाबदार ठरल्याची शक्यता केंद्र सरकारच्या पथकाने वर्तवली आहे. कोरोना महामारीच्या निर्बंध-नियमांना कंटाळून नागरिक आता सार्वजनिक ठिकाणी बेफिकीर वावरू लागले आहेत. त्यांना कोरोना संसर्गाची भीती उरलेली नाही. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यामागे हीच प्रमुख कारणे असतील, असे निरीक्षण नोंदवत केंद्रीय पथकाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारला निर्बंध शिथिल न करण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ञांच्या पथकाने नुकताच (1 आणि 2 मार्च रोजी) महाराष्ट्राचा दौरा केला. या पथकाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या अहवालात काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. अहवालात नागरिकांच्या बेफिकिरीवर बोट ठेवण्यात आले आहे. तज्ञांच्या पथकामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक, राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राचे (एनसीडीसी) उपसंचालक संकेत कुलकर्णी आणि क्षयरोग व श्वसनविकारांसंबंधी राष्ट्रीय संस्थेचे प्राध्यापक आशिष रंजन यांचा समावेश होता.

कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार ज्या उपाययोजना राबवत आहे तसेच जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यात इतक्यात कुठलीही ढिलाई न देण्याची सूचना केंद्रीय पथकाने केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 90 हजारांहून अधिक आहे.

कोरोनाची सध्याची लाट तितकीशी भयंकर नाही ही लोकांची मानसिकता बनलीय. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन आणि चाचणीचे गांभीर्य राहिलेले नाही. सप्टेंबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर आरोग्य यंत्रणेतही थोडी ढिलाई आलीय. ग्रामपंचायत निवडणुका, लग्नसराई, पुन्हा सुरू झालेल्या शाळा व तेथील मुले-पालकांची वर्दळ, सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी अशा विविध कारणांमुळे लोक एकत्र येऊ लागले आहेत. कोरोना त्यामुळेही वाढत आहे.

राज्य सरकारला सूचना

होम क्वारंटाईन केलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांचे जाळे भक्कम करा. हॉटस्पॉट विभागांतील सर्व लोकांची कोरोना चाचणी करा. पॉझिटिव्ह लोकांना वेगळे ठेवा. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, दक्षता आणि चाचणीची मोहिम ‘जैसे थे’ ठेवा.

रविवारची रुग्णसंख्या –
राज्य – 11141
मृत्यू – 38
मुंबई – 1360
मृत्यू – 05

11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत संभाजीनगर जिल्हय़ात अंशतः लॉकडाऊन असणार आहे. तर प्रत्येक शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असेल. अंशतः लॉकडाऊनच्या कालावधीत लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

नागपुरात 24 तासांत 1271 कोरोना रुग्ण आढळले असून माणकपूर भागात सुरू असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीवर पोलिसांनी धाड टापून 11 जणांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या