चंदा कोचर हकालपट्टी प्रकरण, उच्च न्यायालयात आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावरून हकालपट्टी, मिळालेले रोखे आणि आर्थिक भत्ते रोखण्याच्या बँकेच्या निर्णयाविरोधात बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर उद्या, 2 डिसेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पदाचा गैरवापर करून व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देण्याच्या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांची बँकेने हकालपट्टी केली. त्याचबरोबर 2009 ते 2018 पर्यंतचे त्यांना देण्यात आलेले रोखे आणि आर्थिक भत्तेही रोखण्यात आले. बँकेच्या या निर्णयाविरोधात बँकेने केलेली ही हकालपट्टी बेकायदा आणि नियमानुसार नाही असे सांगत कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायाधीश रणजीत मोरे आणि न्यायाधीश मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण
आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 2018 साली मोठय़ा प्रमाणात कॉर्पोरेट कर्ज देण्यात आले. तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांनी नियम डावलून हे कर्ज दिले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गैरप्रकारात बँकेलाही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील याची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) याप्रकरणी चौकशी करत आहेत. सीबीआयने या प्रकरणात कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.