चांदोली धरणही भरण्याच्या मार्गावर; दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यामुळे धरणाच्या मुख्य दरवाजांमधून 1850, तर वीजनिर्मिती केंद्रांतून 1400 असा तीन हजार 250 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, गेल्या पाच-सहा दिवसांपासून चांदोली परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. धरणाचे दोन दरवाजे गेले दोन दिवसांपूर्वी उचलण्यात आले असून, येथून 1250 कयुसेक व वीजनिर्मिती केंद्रातून 800 क्युसेक असा एकूण 2 हजार 50 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. तोच विसर्ग आज रविवारी दुपारी चारच्या दरम्यान वाढवण्यात आला आहे. मुख्य सांडव्यातून 1850 तर वीजनिर्मिती केंद्रातून 1400 असा एकूण तीन हजार 250 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे असा इशाराही धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

धरणात सध्या 34.31 टीएमसी पाणीसाठा असून, धरण 99.72 टक्के भरले आहे. धरण आज 100 टक्के भरेल अशी चिन्हे आहेत. गेले चार दिवस पाऊस सतत चालू असून, 24 तासांत 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी अखेर 2 हजार 652 मिलिमीटर पाऊस येथे पडला आहे. धरणाची पाणी पातळी सध्या 626.80 मीटर आहे.