पाच महिने वेतन न मिळाल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

562

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काम करणा-या स्वच्छता कामगारांना मागील पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून ठिय्या आंदोलन केलं.

चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभिजित सेक्युरिटी सर्व्हिस आणि इंटरनॅशनल सेक्युरिटी या दोन कंत्राटी एजन्सीमध्ये काम करीत असलेले कक्ष सेवक, सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कामगारांचे वेतन मागील पाच महिन्यांपासून झालेलं नाही. या दोन्ही एजन्सीजना वारंवर निर्देश देऊनही त्यांनी करारनाम्यातील अटी व शर्तींचं पालन केलं नाही. त्यामुळं कामगारांना वेतनापासून वंचित राहावं लागलं. शेवटी आज जनविकास सेनेच्या नेतृत्वात शेकडो कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत घेराव घातला आणि मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत ठिय्या देण्याचा निर्धार केला. साक्षात जिल्हाधिकारी कार्यालयातच कामगारांनी तळ ठोकल्यानं पोलिस विभागाची मोठी तारांबळ उडाली. या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठा असल्यानं त्यांना हाकलून लावणं पोलिसांना कठीण गेलं. महिला एवढ्या संतापल्या होत्या की त्यांनी पोलिसांचा प्रतिकारही मोडून काढला आणि घेराव घातला.

ज्या एजन्सींना कामगार पुरवठ्याचं कंत्राट मिळालं, त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांच्याच आशीर्वादानं कंत्राटदार निर्ढावले असून, त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिका-यांनी या कामगारांच्या मागण्यांची दखल घेत शिष्टमंडळाशी आणि अधिष्ठाता मोरे यांच्याशी चर्चा केली. त्यात आठ दिवसांत कामगारांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आणि कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. सुमारे पाचशेवर कर्मचारी या निर्णयानं सुखावले आहेत

आपली प्रतिक्रिया द्या