
भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या पोलीस वाहनाला धडक दिली. यात युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. हा अपघात महानगरातील रहेमतनगर परिसरात घडला. प्रणील प्रमोद चिंचोळकर (29) रा. नगिनाबाग चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.
प्रणील हा दुचाकी वाहनाने शहरातील बिनबा गेट कडून सिस्टर कॉलनीकडे येत होता. तर शहर पोलिसांचे वाहन हे सिस्टर कॉलनीकडून बिनबागेट मार्गे शहर पोलीस ठाण्याकडे जात होते. रहेमतनगर येथील मस्जिदजवळ असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून प्रणील पुढे जाण्यासाठी निघाला. एवढ्यात समोरून दुसरे वाहन आल्याने प्रणीलने ब्रेक मारले. त्यामुळे गाडी घसरून प्रणील हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या शहर पोलिसांच्या वाहनाच्या मागील चाकात आला. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठीगर्दी केली. त्यामुळे या मार्गावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे मृतक प्रणील हा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.




























































