घाटकोपर येथे चार्टर्ड विमान कोसळले, ५ ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
28 जून मुंबईतील घाटकोपरमध्ये विमान कोसळले, वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपरमधील जीवदया लेन येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात १२ आसनी चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. प्रचंड मोठा आवाज होऊन विमान कोसळल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. आगीचे लोळ उठले. क्षणार्धात विमान अक्षरश: जळून खाक झाले. या दुर्घटनेत मुख्य वैमानिक प्रदीपसिंग राजपूत, सहवैमानिक मार्या झुबेर, एयरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीयर मनीष पांडे, सुरभी गुप्ता आणि पादचारी गोविंद पंडीत यांचा जागीच मृत्यू झाला. हे विमान भरवस्तीत कोसळले असते तर शेकडो लोकांचे बळी गेले असते. परंतु, वैमानिकांनी प्रसंगावधान दाखवून लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी विमान उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे विमान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात कोसळले आणि मोठा अनर्थ टळला.

कंपनी कोणाची?
यू.वाय. एव्हिएशनचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कोठारी व त्यांचा मुलगा उदय कोठारी हे आहेत.

खराब हवामानाबााबत मार्यांनी आधीच केले होते सावध
खराब हवामानामुळे विमानाची चाचणी घेता येणार नाही असे मार्या यांनी म्हटले होते. चाचणीला त्यांचा विरोध असतानाही उड्डाण घेण्यात आले, असा आरोप मार्या यांचे पती अॅड. प्रभात कथुरिया यांनी केला. हा कंपनीचा बेजबाबदारपणा असल्याचे ते म्हणाले. विमान ज्या कंपनीचे आहे त्या यू.वी. एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चौहान यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कंपनीने आपली चूक मान्य करायला हवी, असेही अॅड. कथुरिया यांनी सांगितले.

ब्लॅक बॉक्स सापडला
अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यामुळे अपघात कशामुळे घडला त्याची कारणे समोर येतील. विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. एकाने कॉकपिटमधील संभाषण रेकॉर्ड होते तर दुसऱया उपकरणात विमानाचा वेग आणि उंचीचे मोजमाप होते.

पूजा करून चाचणीसाठी उडाले होते विमान
कोठारी बंधू यांच्या एव्हिएशन कंपनीने २०१४ मध्ये व्हीटी यूपीझेड किंग एअर सी-९० हे विमान उत्तर प्रदेश सरकारकडून खरेदी केले होते. विमानाची दुरुस्ती करून आज सकाळी पूजा करण्यात आली. श्रीफळ वाढवून जुहू हेलिपॅडवरून टेस्टिंगसाठी विमानाने उड्डाण घेतले होते. पण दुपारी दीड ते पावणेदोनच्या दरम्यान विमान कोसळले.

शिवसेना मदतीसाठी धावली
विमान दुर्घटनेची माहिती मिळताच घाटकोपरमधील शिवसैनिकांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतली. दुर्घटनेतील दोन जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे त्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी शिवसैनिकांनी सहकार्य केले. तसेच मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला मदत केली. विभागप्रमुख राजेंद्र राऊत, उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, शाखाप्रमुख जितेंद्र परब, गजानन परब, संतोष साळुंखे आदी या मदतकार्यात सक्रीय होते.

यूपी सरकारने २०१४ मध्ये विकले होते विमान
मुंबईत कोसळलेले हे १२ आसनी चार्टर्ड विमान उत्तर प्रदेश सरकारने २०१४ मध्ये विकले होते. यूवी एव्हिएशनने हे विमान खरेदी केली होते अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माहिती विभागाचे मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी दिली. यूवी एव्हीएशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कोठारी हे आहेत.

विमान याआधी एकदा दुर्घटनाग्रस्त झाले होते
हे विमान याआधी उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यानंतर हे विमान विक्रीसाठी काढण्यात आले. बीचक्राफ्ट एअर सी ९० या विमानाची किंमत ८,२५,००० डॉलर म्हणजेच ५ कोटी ७० लाख रुपये इतकी आहे.

याच कंपनीच्या हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्रीही बचावले होते
अपघातग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-९० हे चार्टर्ड विमान हे यूपी सरकारचे विमान ‘यूवाय एव्हिएशन’ कंपनीने खरेदी केले होते. या कंपनीच्याच हेलिकॉप्टरचा अलिबागमध्ये अपघात घडला होता. अलिबागमधून एका कार्यक्रमाहून परतत असताना मुख्यमंत्री बसण्याआधीच पायलटने हेलिकॉप्टर उडवले, मात्र मुख्यमंत्री मागे फिरल्याने ते बचावले.

थोडक्यात बचावलो
विमान कोसळले त्या ठिकाणी मी कामाला होतो. जेवणाची सुट्टी झाल्यामुळे जेवण करण्यासाठी तेथून निघाले. काही पावले चालतपुढे जात नाही तोच मागे विमान येऊन कोसळले. अवघ्या एक मिनिटाचा फरक. नाहीतर मीदेखील बचावलो नसतो. माझ्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. सुदैवाने बचावलो. विमान पडताना पाहिले तेव्हा अंगाचा थरकाप उडाला. सुन्न झालो होतो. इतका प्रचंड अपघात होता तो. मी आणि माझा सहकारी रामनरेश कुमार आम्ही दोघे जखमी झालो असे या दुर्घटनेत जखमी झालेला लवंकुश कुमार याने सांगितले. लवंकुश आणि रामनरेश निशाद यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातात प्रशांत महाकाळ हा शिवसैनिकही जखमी झाला आहे.

वसईच्या कर्मा अपार्टमेंटवर शोककळा
विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले तंत्रज्ञ मनीष पांडे हे वसईतील कर्मा अपार्टमेंटमध्ये पत्नी व आईसोबत राहत होते. मनीष यांचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते आणि पाच महिन्यांपूर्वी ते अपार्टमेंटमध्ये राहण्यास आले होते. मनमिळावू स्वभावाचे असल्याने मनीष याचे अपार्टमेंटमध्ये सर्वांशीच चांगले संबंध होते. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच आम्हाला सर्वांनाच प्रचंड धक्का बसला आहे, अशा शब्दांत अपार्टमेंटमधील रहिवाशांनी शोक व्यक्त केला.

५० बांधकाम मजूर वाचले
एका इमारतीचे बांधकाम सुरू असणाऱया ठिकाणी हे चार्टर्ड विमान कोसळले. दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी ५० बांधकाम मजूर जेवणाच्या सुट्टीवर गेले असल्यामुळे अनेक मजुरांचे प्राण वाचले. दैव बलवत्तर म्हणूनच आपले प्राण वाचल्याची चर्चा बांधकाम मजुरांमध्ये आहे.

महापौरांची घटनास्थळाला भेट
चार्टर्ड विमान कोसळल्याचे वृत्त कळताच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी महापौरांनी अग्निशमन दल आणि पोलीस अधिकाऱयांशी चर्चा करून अपघाताबाबतची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे आणि नगरसेविका अश्विनी मते उपस्थित होत्या.
अत्यंत धक्कादायक घटना आहे. चार्टर्ड प्लेन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पडले. त्यामुळे मोठा हादसा टळला. आजूबाजूला मोठी लोकवस्ती आहे. पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमान लोकवस्तीत कोसळले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सखोल चौकशीनंतर विमान कोसळण्यामागचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानंतर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल.

आम्ही घरातच होतो. विमान पडल्यानंतर थरकाप उडवणारा आवाज झाला. त्यामुळे खिडकीतून खाली पाहिल्यावर धुराचे मोठे लोळ पसरलेले होते. आगीचा भडका उडाला होता. आम्ही सर्वांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पोलीस आणि अग्निशमन दलाला फोन करून माहिती देण्यास सुरुवात केली.
– हसमुख रावल, प्रत्यक्षदर्शी

गॅलरीत उभा होतो. तेव्हा ते विमान खूप खाली आलेले आणि हलत असल्याचे दिसले. त्यानंतर थोडय़ाच वेळात ते विमान इमारतीच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कोसळले. आम्ही लगेच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा फुटपाथवर एक पादचारी होरपळलेल्या अवस्थेत पडलेला होता. त्याच्यावर पाणी टाकून वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. अवघ्या काही सेकंदांत तो पादचारी पूर्णपणे होरपळून फुटपाथवर निपचित पडलेला होता.
– दर्शन पटेल, स्थानिक रहिवासी