
पतीसोबत वाद झाल्यानंतर भावाच्या घरी राहण्यासाठी आलेल्या महिलेने घरातच तब्बल20 तोळे दागिने ठेवले होते. मात्र, चोरट्याने भरदिवसा संधी साधून दरोडा टाकून सर्व दागिन्यांची चोरी केली. त्यामुळे आता आपला आर्थिंक आधार संपला, याच विंवचेने तिला घेरले होते. चतुःशृंगी पोलिसांनी फक्त सीसीटीव्हीमधील पुसटशा रेखाचित्रावरून आरोपींना बेड्या घालून त्याच्याकडून सर्व दागिने जप्त केले. दुसऱ्या गुन्ह्यात एका जेष्ठ महिलेचेही तीन तोळे दागिने आरोपीकडून जप्त केले. त्यामुळे तक्रारदार महिलांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
कौटुंबिक वादातून गृहिणी मुलाला घेउन भावाकडे राहण्यासाठी आली होती. तिने स्वतःचे 20 तोळे दागिनेही सोबत आणले होते. आई-वडिलांच्या निधनामुळे बहीण-भाउ घरामध्ये राहत होते. त्यावेळी ३० जुलैला भरदिवसा चोरट्यांनी त्यांच्या घरावर दरोडा टाकून 20 तोळे दागिने चोरून नेले. महिला कर्नाटकातील हंपी शहरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. घरफोडीत दागिने चोरीला गेल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. एकीकडे पतीसोबत झालेले भांडण, लहान मुलाचे शिक्षण, कौटुंबिक जबाबदारी आणि त्यातच दागिन्यांची चोरी झाल्यामुळे त्या विचारमग्न होत्या.
चतुःशृंगी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींचे फुटेज बारकाईने तपासून पुसटशा छायाचित्रावरून दोन आरोपींना अटक केले. त्यांच्याकडून 20 तोळे दागिने महिलेला परत माघारी मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. दुसऱ्या गुन्ह्यातील एका जेष्ठ महिलेच्या घरफोडीची उकल पोलिसांनी केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस उपनिरीक्ष रूपेश टेमगिरे, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, श्रीकांत वाघवले, प्रकाश आव्हाड, इरफान मोमीन, मुकूंद तारू, दीनेश गडाकुंश, अजय शिर्के, बाबा दांगडे, बाबुलाल तांदळे, तेजस चोपडे, टेमगिरे यांनी केली .
”घरफोडीच्या दोन वेगवेगळे गुन्ह्यात तपास पथकाने अथक प्रयत्न घेउन आरोपींचा माग काढला. त्यानुसार संबंधितांना अटक करून ऐवज जप्त करण्यात आला. त्यातील जवळपास २० तोळ्यांचे दागिने तक्रारदार महिलेला मिळवून देण्यात आले. दुसऱ्या गुन्ह्यातील जप्त ऐवजही लवकरच महिलेला दिला जाणार आहे.”
राजकुमार वाघचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी पोलीस ठाणे




























































