
उन्हाळी सुट्टी सुरू असली तरी लवकरच नवीन शैक्षणिक वर्षाच्या तयारीची लगबग सुरू होईल. येत्या काही दिवसांनी विद्यार्थी आणि पालकांची शालेय वस्तू खरेदीसाठी झुंबड उडालेले चित्र सर्वत्र दिसेल. याचाच गैरफायदा घेऊन पालक व विद्यार्थ्यांची एमआरपीमध्ये फसवणूक करून त्यांच्या खिशावर डल्ला मारला जाऊ नये याची वैधमापनशास्त्र विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. आवेष्टित शालेय वस्तूंच्या विक्री किमतीत झोल आणि मापात अचूकता नसल्याचे लक्षात येताच लगेच आमच्याकडे तक्रार करा असे आवाहन वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.
निकाल लागल्यानंतर शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी विद्यार्थी व पालकांची दुकानांच्या दिशेने पावले वळतात. अशा वेळी पुस्तके, वह्या, गणवेश आदी शालेय वस्तूंच्या खरेदीवेळी पालक व विद्यार्थ्यांची एमआरपीसाठी फसवणूक केली जाते. छापील किमतीपेक्षा जास्त पैसे आकारले जातात. बऱयाचदा जादा पैसे घेऊन मापात पाप केल्याचे प्रकार घडत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी व पालकांची फसवणूक होत असल्याने याची वैधमापनशास्त्र विभागाने गंभीर दखल घेतली आहे. एमआरपीसाठी विद्यार्थी व पालकांची फसवणूक करणे हे कायद्याने गंभीर बाब असल्याने ते आत खपवून न घेण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. शाळेशी संबंधित वस्तूंच्या खरेदीवेळेस होणारी फसवणूक रोखण्यासाठी पालकांनो सतर्क व्हा, आपली एमआरपीच्या बाबतीत फसवणूक होत असल्यास लगेच आमच्याकडे तक्रार करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळेतून वह्या, पुस्तके, शुज, गणवेश दिला जातो. जर आवेष्टित साहित्यावरील किमतीपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील अथवा निश्चित एमआरपीसह वजन आणि मापांमध्ये अचुकता नसल्यास आणि सदर खरेदीची पावती आपल्याकडे असल्यास याबाबतीतदेखील तक्रार करता येईल, असेही या विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
विद्यार्थी व पालकांची होणारी फसवणूक कायद्याने गुन्हा आहे. एमआरपीसाठी जर फसवणूक केली जात असेल तर तत्काळ आमच्याकडे तक्रार करा. संबंधिताविरोधात कठोर कारवाई केली जाईल. ‘एलएममहाराष्ट्र’ या ट्विटर हॅण्डलवरदेखील तक्रार करता येईल.
– रवींद्रकुमार सिंगल, अतिरिक्त महासंचालक (वैधमापनशास्त्र)






























































