कल्याण, डोंबिवली शहरात कचरामुक्तीचा चेन्नई पॅटर्न; महाराष्ट्रातील पहिला अनोखा उपक्रम

कल्याण-डोंबिवली महापालिकेने चेन्नई पालिकेच्या यशस्वी मॉडेलवर आधारित ‘चेन्नई पॅटर्न’ राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच राबवला जाणार असून चेन्नईनंतर संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकाचा उपक्रम ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्या लोकार्पण होणार आहे. कचरामुक्तीच्या चेन्नई पॅटर्नमुळे गेल्या अनेक वर्षांपासून शहराला भेडसावत असलेल्या कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर आता एक प्रभावी तोडगा मिळणार आहे.

चेन्नई महापालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी 2020 पासून सुरू केलेल्या ‘कचरामुक्त शहर’ उपक्रमात उल्लेखनीय यश मिळवले आहे. उरबेसर सुमीत या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेमार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली होती. या उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने शहर स्वच्छतेच्या बाबतीत चेन्नईने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याच धर्तीवर केडीएमसीनेदेखील सुमित एल्कोप्लास्ट या संस्थेमार्फत ‘कचरामुक्त शहर’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विधानसभा क्षेत्रातील सात प्रभाग निवडण्यात आले आहेत. या भागात कचरा संकलन, वाहतूक आणि रस्तेसफाई यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

तीन शिफ्टमध्ये कचरा उचलणार
या नव्या मॉडेलनुसार यापुढे संस्थेला केवळ उचललेल्या कचऱ्याच्या वजनावर आधारित पैसे न देता 45 विशेष नॉर्म्स व ‘की परफॉर्मन्स इंडिकेटर’च्या आधारे देयके अदा केली जाणार आहेत. या निकषांची पूर्तता न झाल्यास दंडात्मक कारवाईची तरतूदही करण्यात येणार आहे. हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण मानले जात आहे. या योजनेत 24 तास, तीन शिफ्टमध्ये काम होणार असून प्रत्येक घरातील कचरा दररोज उचलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहराच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यांसाठी पॉवर स्वीपर मशीन्स, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवता याव्यात म्हणून विशेष मोबाईल अॅप तयार करण्यात येणार आहे.

शहराची नवी ओळख निर्माण होईल
चेन्नईप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीतील नागरिक या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील, असा विश्वास पालिका प्रशासनाला आहे. या नवीन उपक्रमामुळे शहराची स्वच्छतेबाबत नवी ओळख निर्माण होणार आहे. कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे.