‘उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक’चा चेतन नाईक मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेना, ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि आर.सी. फिटनेस जिम आयोजित ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक’ शरीरसौष्ठव स्पर्धेत चेतन नाईकने बाजी मारली. पुरुषांच्या फिजिक गटात सत्यम यादव आणि आनंद यादव यांनी यश संपादले.

गावदेवी सोसायटीच्या मैदानात पार पडलेल्या या स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत ठाणे जिह्यातील तब्बल 200 खेळाडूंनी आपल्या पीळदार शरीरयष्टीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या जेतेपदाच्या लढतीत 90 किलो वजनी गटातील चेतन नाईकने आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव करत ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक’ पटकावला. तो आकर्षक चषकासह रोख 25 हजारांचा मानकरी ठरला. बेस्ट पोझरचा मान छावांग लामाला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख तात्या माने, किशोर मानकामे, युवासेना जिल्हाधिकारी प्रतीक पाटील, हर्षवर्धन पालांडे, शहरप्रमुख विवेक खामकर, डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, रोहिदास मुंडे, कविता गावंड, मंगला सुळे, प्रवीण पांडव, समीर दाबिलकर तसेच राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, दिलीप माने उपस्थित होते. उपशहरप्रमुख अभिजित सावंत व युवा शहर अधिकारी राहुल चौधरी यांनी स्पर्धेचे अप्रतिम आयोजन करत सर्वांची मने जिंकली.

स्पर्धेचा गटवार निकाल
55 किलो वजनी गट- 1. दीपेश भोईर, 2. रमेश जाधव , 3. राहुल पाटील.
60 किलो- 1. संतोष यादव, 2. सागर नागावकर, 3.दीपक गुप्ता.
65 किलो- 1. नितीन म्हात्रे, 2. अविनाश पाटील, 3. राज थापा.
70 किलो- 1. मयूरेश मारे, 2. संजय पवार, 3.बप्पन दास.
75 किलो- 1. संदीप सावळे, 2. विनायक लोखंडे, 3. विलास पडवळे.
80 किलो- 1.आशुतोष साहा, 2. रोहन म्हात्रे, 3. गणेश उपाध्याय.
80 किलोवरील- 1. चेतन नाईक, 2. सम्राट ढाले, 3. नितीन आडोले.