
मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत संभाजीनगरमधील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यासाठी सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे. नागरिकांना योग्यरीतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले.
संभाजीनगर शहर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीला उद्योगमंत्री व संभाजीनगर जिह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व अन्य उपस्थित होते.
1 हजार 680 कोटींची पाणीपुरवठा योजना
संभाजीनगर शहरातील 1 हजार 680 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.



























































