‘या’ कारणांमुळे चीन मसूदला पाठीशी घालतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानातील विदेशी कंपन्यांमध्ये 77 कंपन्या चीनच्याच आहेत. तिथे चीन ‘सी पॅक’मध्ये 3.8 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. पाकिस्तानातील अनेक प्रकल्पांवर चीनने 3.2 लाख कोटी आधीच खर्च केले. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत चीन हा हिंदुस्थानला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानतो. दक्षिण आशियातील महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्यास हिंदुस्थानला फुरसत मिळू नये त्यासाठी देशांतर्गत समस्यांमध्ये त्याला गुंतवून ठेवण्याचा चीनचा डाव आहे. मसूद आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाल्यास हिंदुस्थानचे जागतिक स्तरावर ‘वजन’ वाढेल. चीनला हे नको आहे.

अमेरिका आणि दलाई लामा – हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या जवळिकीमुळेसुद्धा चीनच्या मनात राग आहे. हिंदुस्थान मसूद अजहरला ज्या नजरेने पाहतो त्याच नजरेने चीन दलाई लामांकडे पाहत आला आहे. त्यामुळे चीनने अझरला ‘हत्यार’ बनवले आहे.

नरेंद्र मोदी चीनला घाबरतात -राहुल
आपले दुबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. कारण चीन जेव्हा कधी हिंदुस्थानविरुद्ध कारवाई करतो तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या तोंडातून चकार शब्दही येत नाही असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी खळबळ उडवून दिली. राहुल यांच्या ट्विटर हँडलवरील या ट्विटविरुद्ध देशवासीयांनी मोठय़ा प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला. याच मुद्दय़ावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.

राहुल, तुमच्या पणजोबांमुळेच चीनला महत्त्व मिळाले!
‘तुमच्या पणजोबांनी स्थायी सदस्यत्वाची जागा चीनला भेट म्हणून दिली नसती तर चीन आज सुरक्षा मंडळामध्ये नसता. नेहरू-गांधी कुटुंबाने केलेल्या सर्व चुका आता हिंदुस्थान दुरुस्त करत आहे. हा विषय मोदींवर सोडून तुम्ही चीनच्या शिष्टमंडळांना गुप्तपणे भेटणे सुरूच ठेवा’ असा टोलाही भाजपने आपल्या ट्विटमधून राहुल गांधी यांना लगावला आहे.