राज्यभरात थंडीचा जोर; मुंबईत ख्रिसमसपर्यंत वाट पाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडून वाहणाऱया थंड वाऱयामुळे राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. मुंबईत मात्र थंडीची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगरात, ठाणे, नवी मुंबईत रात्री आणि पहाटे गारवा जाणवत आहे. प्रत्यक्षात थंडीचा शिरकाव होण्यासाठी ख्रिसमसपर्यंत वाट पहावी लागेल, असे हवामान विभागाने सांगितले.

मुंबईसह उपनगरात दिवसभर कडक ऊन आणि घामाच्या धारा तर रात्री आणि पहाटे हलकासा गारवा असे वातावरण आहे. मार्निंग वॉकला जाणाऱयांना आल्हाददायक वातावरणाचा अनुभव मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात थंडी पडत असल्याचे चित्र आहे, अशी माहिती मुंबईच्या कुलाबा वेधशाळेच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईचा पारा 1 ते 2 डिग्री सेल्सियसने वाढेल, त्यानंतर दोन दिवसांत पुन्हा घसरेल. ख्रिसमसपर्यंत मुंबईत थंडी जाणवायला लागेल, असे त्यांनी सांगितले.

विदर्भ, मराठवाडा गारठला
उत्तरेत मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी होत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर वाढल्याचे कुलाबा वेधशाळेच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले. चंद्रपूर, नाशिक, नगर, वाशीम, गडचिरोली, गोंदिया, महाबळेश्वर येथे किमान 14 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली तर अनेक भागात 15 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. मुंबईत किमान 20 ते 22 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.