
मुंबईकरांवर खरे प्रेम असेल तर कांजूरची ओसाड जमीन का देत नाही? ती द्या. मेट्रो बदलापूर ते अंबरनाथपर्यंत धावेल. मुंबईच्या पम्पिंग स्टेशनसाठी जागा मागतोय, धारावीच्या पुनर्वसनासाठी रेल्वेची जमीन मागतोय ती द्या ना. मुंबईकरांचे हे अडलेले प्रकल्प मार्गी लावण्यास मदत करा, असा जमालगोटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजप सरकारला दिला. मेट्रो मार्ग 7 आणि मेट्रो 2 (अ) या मार्गांच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोरेगाव येथे भव्य कार्यक्रमात झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई मेट्रोच्या श्रेयासाठी खूपच जळफळाट सुरू आहे. मी तर म्हणेन, मेट्रोचे श्रेय तुम्हीच घ्या, तुम्ही सुरुवात केली, आम्ही त्यास पुढे नेले. त्याला अडवून ठेवले नाही, तर पुढे नेले. जसे आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूरऐवजी गडचिरोलीपर्यंत वाढवला. या कामांचे श्रेय कोणाचे असेल, तर ते मुंबईकरांचे आहे. मुंबईकर कष्ट घेत आहेत. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सर्वाधिक भरणारे राज्य आहे. मुंबई देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा ताठ कणा आहे. हा ताठ कणा ताठ ठेवण्याचे काम आम्ही करतोय, पण त्या बदल्यात मुंबईला काय मिळतेय? द्यायची वेळ आली तर आम्ही मर्जी असेल तेव्हा देणार ? आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा महाराष्ट्राला छत्रपतींचा वारसा असल्याचे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
राजकारणात नवीन साथ आली आहे…
कोरोनानंतर राजकारणात हल्ली एक नवीन साथ आली आहे. या साथीच्या विषाणूचा शोध अजून लागलेला नाही. जे काही केले ते आम्हीच केले, तुम्ही काही केलेच नाही आणि नवीन काही केले तर भ्रष्टाचार केला असा आरोप ठोकायचा अशी सध्या राजकारणाची अवस्था असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन चालवा…
मुंबईचा विकास आम्ही केला असे सांगायचे आणि अर्ध्या रात्रीत झाडे कोणी तोडली हेही मुंबईकरांनी पाहिले आहे. आम्ही पर्यावरणाचा समतोल ढळू न देता विकास करत आहोत. मुंबईच्या आर्थिक केंद्रासाठी हवी असलेली लाखमोलाची जमीन बुलेट ट्रेनसाठी यांना हवी आहे. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन चालवून मुंबईला काय उपयोग? चालवायचीच असेल तर आर्थिक राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरपर्यंत चालवा, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेही भाषण झाले. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, वस्त्र्ााsद्योग मंत्री अस्लम शेख, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदी मान्यवर उपस्थित होते.
विकासाची गुढी उभारत आहोत…
मुंबईत 16 प्लानिंग एजन्सी आहेत. त्यांच्या समन्वय साधून काम करावे लागते. शहरीकरण वाढत असून उपनगर जिह्याचा पालकमंत्री या नात्याने खूप मोठा परिसर असून सव्वा दोन कोटी जनता येथे राहत असून फ्टोटिंग पॉप्युलेशन सर्वाधिक आहे. सरकारचे बजेट झाल्यानंतर लागलीच कोरोना लॉकडाऊन घोषित दोन वर्षे संकट आले. परंतु प्रगतीचा वेग थांबला नसून विकासाची गुढी उभारत आहोत असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवडी ते न्हावाशेवा मार्ग 64 टक्के पूर्ण झाला असून सप्टेंबरपर्यंत तो पूर्ण होईल. कोस्टल रोडचे काम 55 टक्के पूर्ण झाले असून 2023 पर्यंत तो तयार होईल, नरीमन पॉईंट ते कफपरेडचा रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार आहे असेही ते म्हणाले.
पहिली मेट्रो आठ वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात सुरू झाली. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख अशा मुख्यमंत्र्यांच्या काळात कामे झाली. त्या कामांचा शेवट भलत्याच मुख्यमंत्र्याच्या काळात झाला. त्यामुळे श्रेयाचा वाद घालू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दोन वर्षांत कोरोना संकट असूनही मुंबईकरांच्या पायाभूत सुविधांची कामे थांबविली नाहीत, असेही पवार आपल्या भाषणात म्हणाले.
दहिसरकरांनी घेतला मेट्रो सफारीचा आनंद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य मंत्र्यांनी मेट्रोच्या अधिकार्यांसोबत आरे कॉलनी ते कुरार आणि पुन्हा कुरार ते आरे कॉलनी असा मेट्रोतून प्रवास केला. सायंकाळी आठनंतर मेट्रोचे दरवाजे सर्वसामान्य प्रवाशांना खुल करण्यात आले. प्रवाशांनी गुढीपाडव्याचा आनंद मेट्रोची सफर करीत घेतला. यावेळी तिकीट न आकारल्याने थोडी गर्दी झाली. उद्या सकाळपासून मेट्रोचा प्रवास तिकीटाआधोर सुरू होणार आहे.































































