
तरुण वर्गामध्येही मोठय़ा प्रमाणावार कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे या वयोगटाला विषाणूपासून वाचवणे आवश्यक असून 25 वर्षापुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षापुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असेही या पत्रात म्हटले आहे.
मोठय़ा संख्येने तरुण वर्ग विशेषतः जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे. पेंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झाला पाहिजे हा निर्धार
राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्य पद्धती ठरविली आहे असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून काल 4 एप्रिल रोजीपर्यंत 76.86 लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. 3 एप्रिल रोजी तर आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे 4.62 लाख जणांना लस दिली असल्याची माहिती दिली.
दीड कोटी डोस मिळावेत
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या 6 जिह्यांसाठी केवळ 3 आठवडय़ांत 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे , याकरिता दीड कोटी डोस मिळावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
आज 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक
पेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उद्या मंगळवारी 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी काय उपाय करता येतील यावर चर्चा होईल.
गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, असे पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले. कोरोना लसीकरण मोहिमेबाबत या बैठकीत आढावा घेण्यात येईल.




























































