
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णसंख्येनुसार निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले; मात्र यानंतर दुसऱयाच दिवशी उसळलेली गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर आपण असेच गाफील झालो तर संथगतीने सुरू होणाऱया आयुष्याला पुन्हा ब्रेक लागेल. मुंबईत पुन्हा अशीच गर्दी होत राहिली तर निर्बंध कठोर करावे लागतील, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
मेट्रो लाइन 2 व मेट्रो लाइन 7 च्या मार्गिकांवर मेट्रोची चाचणी आजपासून सुरू करण्यात आली. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीचा शुभारंभ केला. या शुभारंभासाठी येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात ट्रॅफिक दिसले. कोरोनाचे निर्बंध लागू असतानाही दिसलेल्या या ट्रॅफिकबाबत दोघांनीही नाराजी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आज रस्त्यावरचे ट्रॅफिक बघून मी आश्चर्यचकित झालो. मी काल नेमकं काय बोललो अशी एकदा चौकशीही केली. मी चुकून सगळी बंधनं उठवली असं तर म्हणालो नव्हतो ना याबद्दल दोघा-तिघांना विचारलं. मुंबई किंवा महाराष्ट्रात आपण बंधनं उठवलेली नाहीत. अजूनही कोरोनाचा धोका संपलेला नाही. जर का आपण गाफील झालो तर संथगतीने सुरू होणाऱया आयुष्याला पुन्हा ब्रेक लागेल. मुंबईत पुन्हा अशीच गर्दी होत राहिली तर निर्बंध कठोर करावे लागतील.
या विकासकामांचा शुभारंभ
डहाणूकरवाडी ते आरे स्थानकांदरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल 1 अणि 2) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी- उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाणपुल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्याचप्रमाणे नीरा आडारकर लिखित ‘मल्टिप्लिसिटीज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
आठवलेंना टोला
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेदेखील उपस्थित होते. केंद्रातून मदत मिळवून देण्याच्या आठवले यांच्या आश्वासनावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘रामदास आठवले माझे शेजारी आहेत. आपण राज्याला केंद्राकडून मदत मिळवून देऊ असे आठवले म्हणत आहेत. त्यांनी ही मदत करावीच, पण अजूनही काही ‘आठवले’ तर आणखी सांगतो.’ या वक्तव्यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.
पश्चिम द्रुतगती महामार्ग हा दुसरा गेटवे ऑफ इंडिया – आदित्य ठाकरे
मुंबई शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग हा दुसरा गेटवे ऑफ इंडिया असून या महामार्गावरील वाहतूककोंडी आणि गर्दी कमी करण्यासाठी नियोजन केले जात आहे. या महामार्गावर सुबक आखीव रेखीव डिजाइन्स, हिरवळ तयार करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर ते माहीमपर्यंत सायकलिंग किंवा चालत जाण्याची सोय करण्याचे नियोजित असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
केंद्राकडून होणारा भेदभाव जाणवतो – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘तौकते’ चक्रीवादळानंतर महाराष्ट्राला डावलून थेट गुजरातला मदत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीविषयी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, तौकते चक्रीवादळानंतर पंतप्रधान सर्वप्रथम मुंबईत येणार होते, त्यानंतर ते गुजरातला जाणार होते. मात्र काही कारणाने पंतप्रधानांचा इकडाचा दौरा रद्द झाला, पंतप्रधान थेट गुजरातला गेले अन् गुजरातची मागणी काही नसतानादेखील तत्काळ त्यांनी 1 हजार कोटी जाहीर केले. पण महाराष्ट्राला जेवढे योग्य वाटतील तेवढे तरी पैसे त्यांनी द्यायला हवेत. त्यातही आम्ही समाधानी होऊ. असे अजित पवार म्हणाले.
कोरोनाच्या काळातही मुंबईसारख्या वेगवान महानगराच्या विकासाचा वेग कमी होऊ दिलेला नाही. निर्बंध जेव्हा उठतील तेव्हा अधिक जोमाने, कित्येक पटीने आपले आयुष्य गतिमान होण्यासाठी म्हणून ही कामे करीत आहोत.


































































