जिल्हाधिकाऱ्यांची वाळू माफीया विरोधात दबंग कारवाई, 4 कोटी रुपयांची वाळू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sand-mafia
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । गेवराई

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. राजापुर येथे वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती मिळताच बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वत:जाऊन अनधिकृत वाळू साठा जप्त करण्याची कारवाई केली. त्यांच्यासोबत तहसिलदार व पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. रात्री उशिरा ही कारवाई जिल्हाधिकारी यांनी केल्याने वाळू माफीयांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राजापूर येथील कारवाईत चार कोटी रुपयांचा वाळू साठा जप्त करून विविध वाहनाद्वारे गेवराईत आणला आहे. अनधिकृत वाळू साठा जप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी आपल्या ताफ्यासह राजापुरात पोहोचण्या आधीच वाळू तस्करांना याची माहिती मिळाली. राजापुरातून वाळू उपसा करणारी यंत्रणा हलवण्याचे काम सुरू झाले. बुधवारी सांयकाळी जिल्हाधिकारी राजापुरात जाऊन धडकले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक दीड हजार ब्रॉसचा वाळू साठा आढळून आला. विविध वाहनांद्वारे पात्रांतून वाळू उपसा सुरू होता. जिल्हाधिकारी राजापुरात उशिरा पर्यंत तळ ठोकून होते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: त्या ठिकाणी जाऊन केलेल्या कारवाईमुळे परिसरातील गावात आनंद व्यक्त केला जात आहे. जवळपास चार कोटी रुपयाचा अनधिकृत वाळू साठा जप्त करून कारवाई करण्यात आली.