पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशनमध्ये गुन्हेगारांची झाडाझडती; मोठा शस्त्रसाठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरूवारी रात्री कोंविंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यानुसार 249 जणांची तपासणी केली असता, त्यामध्ये 66 गुन्हेगार आढळून आले. त्याशिवाय आर्मअ‍ॅक्टनुसार 50 गुन्हे दाखल करून 50 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 36 कोयते, 2 पालघन, सत्तूर , चाकू असा 13 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. तडीपारीचा आदेश भंग करून शहरात राहत असलेल्या 9 सराईतांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांना एकाला अटक केली असून त्यांच्याकडून 28 हजारांचे पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याशिवाय 36 कोयते, 2 पालघन, सत्तूर , चाकू असा 13 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात राहत असलेल्या 9 सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामध्ये सुधीर उर्फ गट्या चंद्रकांत गवस (रा. येरवडा) , लक्ष्मीकांत उर्फ लक्या सुर्यकांत जावळे (रा. मंगळवार पेठ) , अजरूद्दीन उर्फ अज्जु मेहबूब शेख (रा. हडपसर) , खुशाल उर्फ दाद्या संतोष शिंदे (रा. अपर बिबवेवाडी), मनोज अरूण पांडागळे (रा. कोंढवा) , प्रेम अंकुश शिंदे (रा. आंबेगाव) , सर्फराज उर्फ डर समीर शेख (रा .गंजपेठ), योगेश बाबूराव पाटणे (रा. कसबा पेठ), शुभम राजेश भोसले (रा. कसबा पेठ) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार दोन आरोपींना अटक करून 40 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेने लोणी काळभोर परिसरातील आरोपी सागर बाळू धोत्रे याला अटक केली. त्याशिवाय दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि प्रत्येक पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली आहे.

शहरातील कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येते. त्यानुसार गुरूवारी शहराभरात गुन्हे शाखेसह प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन राबविले. त्यानुसार गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली असून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
– डॉ. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे