पैलवानांबद्दल आक्षेपार्ह दृश्यामुळे ‘कमांडो 3’ वादात, ‘ते’ दृश्य वगळण्याचा इशारा

1250
commando-3

पैलवानांबद्दलच्या आक्षेपार्ह दृष्यांमुळे या आठवडय़ात प्रदर्शित झालेला अभिनेता विद्युत जामवालचा ‘कमांडो 3’ हा चित्रपट वादाच्या भोवऱयात अडकला आहे. या चित्रपटातील एका दृश्यामध्ये काही पैलवान मुलींची छेडछाड करताना दिसत आहेत. त्यातील संवादही आक्षेपार्ह आहेत. या दृश्यामुळे पैलवानांची आणि कुस्ती या खेळाची प्रतिमा मलिन होत असून राज्यभरातील पैलवानांमध्ये नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटातील ही आक्षेपार्ह दृश्ये तत्काळ वगळण्याचा इशारा शिवसेना चित्रपट सेनेने निर्मात्यांना दिला आहे.

‘कमांडो 3’ या चित्रपटातील एका दृष्यात काही पैलवान एका मुलीला छेडत असल्याचे दिसत आहे. संबंधित मुलगी याबाबत अनेकांना सांगते, परंतु आखाडय़ातील पैलवानांच्या दहशतीपोटी कुणीही त्या मुलीच्या मदतीसाठी पुढे येत नाही. शेवटी नायक तिथे येऊन पैलवानांची धुलाई करतो असा चित्रपटात प्रसंग आहे. अनेक पैलवानांनी यावर आक्षेप घेत शिवसेना चित्रपट सेनेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

महाराष्ट्राला कुस्तीची फार मोठी परंपरा आहे. देशाला पहिले ऑलिम्पिक पदकही पैलवान खाशाबा जाधव यांनीच मिळवून दिले. पैलवान हे महिलांच्या संरक्षणासाठी सदैव मदतीला धावून आले आहेत. असे असतानाही ‘कमांडो 3’ या सिनेमात पैलवानांची प्रतिमा मलिन केली आली आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर असून हे दृश्य तत्काळ चित्रपटातून वगळण्यात यावे.

– सुशांत शेलार, कार्याध्यक्ष, शिवसेना चित्रपट सेना

स्त्रीयांचे रक्षण हे आमचे आद्य कर्तव्य

पैलवान म्हणजे भगवान हनुमानाचे भक्त. स्त्रीयांचे रक्षण करणे हे पैलवानांचे आद्य कर्तव्य आहे. मात्र अशा प्रकारच्या दृश्यांमुळे चुकीचा संदेश जनमानसात पोहोचत आहे. याचा आम्ही निषेध करतो. आजवर राज्यातील एकाही पोलीस ठाण्यात पैलवानांविरोधात विनयभंगाचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. कंमाडो-3 मधील हे दृश्य निर्मात्यांनी चित्रपटातून तत्काळ वगळले नाही तर येत्या दोन ते तीन दिवसांत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ‘हिंद केसरी’ रोहित पटेल यांच्या नेतृत्वाखाली तक्रार करणार आहोत.
– दत्तात्रय जाधव, राष्ट्रीय कुस्ती संघटक

आपली प्रतिक्रिया द्या