
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासीयांसह वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 31 मेपर्यंत महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होईल, असे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम संथगतीने सुरू असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत आहे. काही ठिकाणी सेवा रस्ते तयार नसल्याने वाहनांना खड्डेमय आणि अरुंद मार्गांवरून प्रवास करावा लागत आहे. उड्डाणपूल, नाले, साईडपट्ट्या आणि डांबरीकरणाची कामेही अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले होते. आता मान्सून तोंडावर आल्याने अपूर्ण रस्त्यांवर चिखल, पाणी साचणे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः घाट परिसर आणि काम सुरू असलेल्या भागांमध्ये अपघाताचा धोका वाढला असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी महामार्ग धोकादायक बनणार आहे.
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि प्रवासी संघटनांकडून कामाचा वेग वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. महामार्गावरील अपूर्ण कामामुळे पर्यटन, वाहतूक आणि स्थानिक व्यापारावरही परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांकडून काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी किमान धोकादायक आणि अपूर्ण भागांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



























































