
देशात तयार झालेल्या लसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 93 देशांना विकल्या. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरणावर परिणाम झाला आहे. मोदी यांच्या या कृतीबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या वतीने उद्यापासून मुंबईतील लसीकरणाच्या केंद्राबाहेर आंदोलन पुकारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज केली.
भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला. केंद्र सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या विरोधातील या आंदोलनाची सुरुवात उद्या सोमवारी उत्तर मुंबईतून होईल. सकाळी दहा ते अकरा यावेळेत काँग्रसचे कार्यकर्ते मुंबईत 36 विधानसभा क्षेत्रात मार्केट किंवा लसीकरणाच्या ठिकाणी मानवी साखळी करतील. मास्क, अंतर राखून साखळी करतील ‘मोदीजी हमारी बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यो भेज दिया हे’ हे पोस्टर्स कार्यकर्त्यांच्या हातात असतील. प्रत्येक दिवशी सर्व विधानसभा क्षेत्रात उद्यापासून सहा दिवस आंदोलन सुरू राहील.































































