
राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू आहे. त्यातच राजकीय आरोपांचे फटाके फुटू लागले आहेत. राज्यातील 21 सत्ताधारी आमदारांना एकाच ठेकेदाराकडून ‘डिफेंडर कार’ दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा येथील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कोट्यवधी रुपयांच्या डिफेंडर गाडीबाबत भाजपने संशय व्यक्त केला आहे. त्यातच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील 21 सत्ताधारी आमदारांना एकाच ठेकेदाराकडून डिफेंडर कार दिवाळीनिमित्त गिफ्ट देण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. आता हे 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा ठेकेदार कोण? याचे उत्तर लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
शिंदे गटाच्या आमदाराची 3132 क्रमांकाची गाडी चर्चेत
बुलढाण्यात एक डिफेंडर कार दिसली, त्यावर आमदाराचे स्टीकर लावण्यात आले होते. ती कार एका कंत्राटदाराच्या नावावर आहे. यावरून भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ही कार कोणत्या कंत्राटातून कमिशन मिळाली, असा प्रश्न करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला होता. यावर गायकवाड यांचा फेवरेट 3132 हा वाहन नंबर आहे. काँग्रेसने केलेल्या आरोपांमुळे ही कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काळात 50 खोके एकदम ओक्के असा नारा गाजला होता, तसाच आणखी एक नारा येऊ पाहतोय. सत्ताधाऱ्यांना 21 डिफेंडर कार मिळाल्यात. त्यातील एक बुलढाण्यातली आहे की ती 22वी आहे हे पत्रकारांनी शोधावे असे सपकाळ म्हणाले.






























































