Assembly Elections 2023 – निकालाआधीच ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’, काँग्रेसने ‘संकटमोचक’ शिवकुमारांकडे सोपवली मोठी जबाबदारी

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी (3 डिसेंबर) पार पडणार आहे. मतमोजणीआधी आलेल्या एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर अंदाजांनी काँग्रेसला पुढे चाल मिळण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस सतर्क झाली आहे. काँग्रेसने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. छत्तीसगडमध्ये काठावरचे बहुमत मिळवून काँग्रेस पुन्हा सरकार बनवू शकते. राजस्थानात सत्ताबदल होऊ शकतो. मात्र, तेलंगणात बीआरएसला मोठा झटका बसून काँग्रेसला सत्ता स्थापनेची शक्यता आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस 70च्या आकड्याजवळ पोहोचू शकली नाही तर येथील आमदारांना बंगळुरूमध्ये नेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. येथे त्यांना हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येईल.

तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेत येईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. 119 सदस्य असलेल्या तेलंगणा विधानसभेमध्ये सरकार बनवण्यासाठी 60 हा जादुई आकडा आहे. या आकड्याच्या आसपास काँग्रेस पोहोचल्यास आमदारांची खरेदी-विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली असून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

शिवकुमार आणि इतर राज्यातील काँग्रेस आमदारांची ठेप ठेवण्यासाठी 2-3 रिसोर्टचीही पाहणी करण्यात आली आहे. राजस्थान आणि तेलंगणाप्रमाणे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील आमदारांनाही शिफ्ट करायची गरज भासल्यास त्यासाठीही तयारी सुरू असल्याची माहिती कर्नाटक काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. यावर शिवकुमार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

निकालांपर्यंत टेन्शन… टेन्शन… निवडणूक अंदाजांनी उडाली अनेक नेत्यांची झोप

पाचही राज्यांमध्ये काँग्रेस आरामात विजय मिळवेल आणि सत्तेत येईल. पण पक्षाला गरज भासल्यास वरिष्ठांच्या निर्देशांप्रमाणे मी काम करेन, असे शिवकुमार म्हणाले. याआधी 2018मध्ये कर्नाटक विधानसभेमध्ये शक्तीप्रदर्शनावेळी शिवकुमार यांनीच काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांची व्यवस्था केली होती. तसेच 2019मध्ये गुजरातमधील काँग्रेस आमदारांनाही कर्नाटकातील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते.