
महापालिकेत एक महिन्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहणाऱया सर्व पक्षांच्या नगरसेवकांना चिटणीस खात्याने नियमानुसार पत्र पाठवले. मात्र, केवळ आपल्या पक्षातील नगरसेविकेला जाणूनबुजून त्रास देण्यासाठीच हे पत्र पाठवले गेले आहे, असा आरोप काँग्रेसने केल्यानंतर आता भाजपनेही स्थायी समितीत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याची तक्रार स्थायी समिती अध्यक्षांकडे केली आहे.
मात्र, पालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेत काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला बांधला गेला आहे. त्यामुळेच चिटणीस खाते आणि स्थायी समितीच्या नियमित कामावरूनही हे दोन्ही पक्ष थयथयाट करत आहेत, असा टोला लगावत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी समाचार घेतला.
काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहा सिद्दीकी यांनी 21 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर अशा 16 दिवसांच्या सुट्टीसाठी लेखी अर्ज केला होता. नगरसेवकाला गैरहजर राहायचे असेल तर तसे चिटणीस खात्याला लेखी अर्ज देऊन सुट्टी मंजूर करून घ्यावी लागते.
सिद्दीकी यांची सुट्टी फक्त 16 दिवसांची असल्यामुळे ती स्थायी समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवर घेण्यात आली नाही. मात्र, नगरसेविका सिद्दीकी या पूर्ण डिसेंबर महिना गैरहजर होत्या. मुंबई महापालिका तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणतेही कारण न देता गैरहजर राहणाऱया नगरसेवकाचे पद पालिका अधिनियम 17 (ब) नुसार रद्द करू शकते, तसे अधिकार पालिकेला आहेत.
त्यामुळे तशा आशयाचे स्मरणपत्र चिटणीस खात्याने सिद्दीकी यांना आठवण करून देण्यासाठी पाठवले. मात्र, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी संबंधित पत्र काँग्रेसला जाणूनबुजून त्रास देण्यासाठीच पाठवल्याचे सांगत शिवसेनेवर आरोप केले. चिटणीस विभाग स्थायी समितीच्या दबावाखाली काम करत आहे, असे सांगत पालिका चिटणीसांना पदावरून बडतर्फ करा, अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.
मात्र, हा प्रकार म्हणजे पालिकेतील काँग्रेसचा बालीशपणा असल्याचे खरमरीत प्रत्युत्तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. जाधव यांनी चिटणीस विभागाने पाठवलेली पत्रे पत्रकार परिषदेत दाखवून काँग्रेसच्या दाव्याची पोलखोल केली.
पालिकेतील काँग्रेस वैफल्यग्रस्त
गेल्या 10-12 दिवसांपासून पालिकेतील विरोधी पक्ष नेते बेछूट आरोप करत आहेत. वैफल्यग्रस्त झाल्यानेच काँग्रेस असे बेछूट आरोप करत आहे. शिवसेनेने पालिकेत स्वबळावर सत्ता मिळवली आहे. त्यामुळे असे आरोप करून शिवसेनेवर कोणी दबाव आणू पाहत असेल तर ते कोणालाही शक्य होणार नाही.
‘स्वबळ’ काय असते, ते कोणी शिवसेनेला शिकवू नये. काँग्रेसने तक्रार जरूर करावी, पण चुकीच्या पद्धतीने बोलू नये, असा सल्ला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिला.



























































