
सामना ऑनलाईन । बुलढाणा
भाजप सरकारविरोधातील काँग्रेसच्या जनसंपर्क अभियान यात्रेला बुलढाणातील खामगावमधून सुरूवात करण्यात आली. यावेळी भाजप सरकारवर चौफेर टीका करण्यात आली. देशामध्ये आतापर्यंत अनेक पंतप्रधान झाले. पंडीत नेहरुंनी मजबुत देशाचा पाया रचला. लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान चा नारा दिला, इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांग्लादेशाची निर्मिती केली, बँकांचे राष्ट्रीयकरण केले. राजीव गांधींच्या काळात संगणक युगाला सुरुवात झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरण अणुचाचणी केली. तर मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबुत केली. या सर्वांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेऊन जगामध्ये देशाची प्रतिमा तयार केली. मात्र, देशाचे सध्याचे पंतप्रधान स्वतःला चौकीदार म्हणवतात आणि चोरांना साथ देतात असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांचा खोटारडेपणा जनतेच्या लक्षात आला असून जनता त्यांना धडा शिकवेल असा विश्वास या यात्रेत व्यक्त करण्यात आला.
मोदी सरकारने जनतेवर वाईट वेळ आणली आहे. देशाच्या सीबीआय, सुप्रीम कोर्ट, आर.बी.आय. सारख्या लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संस्थांच्या कामात हस्तक्षेप करुन त्या उलथवून टाकण्याचा घाट सरकराने घातला आहे. राफेल विमान खरेदी घोटाळा हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. देशाचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत मोदी सरकारची पोलखोल करावी असे आवाहन अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली जनसंपर्क अभियानाला खामगांव येथून सुरुवात झाली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत आहेत. हे जर असेच सुरु राहीले तर देशाची लोकशाही जिवंत राहणार नाही. त्यामुळे जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचारांचा वारसा जोपासणार्या काँग्रेसचे विचार पक्षाच्या विविध योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहचवून नरेंद्र – देवेंद्र सरकारचा फोलपणा समोर आणावा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, भाजपाचे दळभद्री सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून रोज हजारोंच्या संख्येने जगाचा पोशिंदा आत्महत्या करीत आहे. वर्हाडात दर दिवशी तीन शेतकरी आत्महत्या करीत असून मागील 10 महिन्यात जवळपास 928 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशात अनेक गंभीर प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करुन भाजप सरकार देशामध्ये जातीपातीचे व धर्माचे राजकारण करुन सामाजिक वातावरण गढूळ करु पाहत आहे.
यावेळी व्यासपीठावर आमदार वजाहत मिर्झा, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, राज्य0 काँग्रेसचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश सरचिटणीस बुलढाणा जिल्हा प्रभारी मदन भरगड, राज्य महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जयश्री शेळके, डॉ. तबस्सुम हुसैन, खामगांव मतदार संघाचे निरीक्षक कासमभाई गवळी, सुनिल सपकाळ, माजी जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ अंभोरे, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती ढोकणे, माजी नगराध्यक्षा अलकादेवी सानंदा, उपाध्यक्षा सरस्वतीताई खासने, माजी जि. प. सदस्या वर्षा वनारे, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी चिंत्रागण खंडारे, अॅड. मजीद कुरेफी, रशीदखान जमादार, ज्ञानेश्वर सुरोसे, अनंतराव आळशी, सतिश मेहेंद्रे, शैलेश खेडेकर, शैलेश सावजी, श्लोकानंद डांगे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष मो. वसीमोद्दीन, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शांताराम पाटेखेडे व अजय तायडे यांनी केले. खामगांव तालुका अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार यांनी आभार मानले.

































































