राज्यसभा निवडणूक बिनविरोध? काँग्रेस नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांनी तर भाजपने संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती कॉँग्रेस नेत्यांनी केली. यावर फडणवीस यांनी पक्षात कुठलाही निर्णय आपण एकटे घेत नाही. कोअर कमिटीशी चर्चा करून यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, या भेटीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक बिनविरोध होण्याची विनंती भाजपला केली आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल अशी आपल्याला खात्री असून राज्यात जी परंपरा आहे ती कायम राहावी यासाठी ही भेट घेतली. निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं थोरात यांनी स्पष्ट केलं.

आपली प्रतिक्रिया द्या