शक्ती प्रदर्शनासह काँग्रेसचे भाऊ पाटील उतरले मैदानात 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली 

पक्षांतर्गत विरोध व गटबाजीची चर्चा नको, यासाठी मी सक्षम आहे. तुमच्या ताकदीवर आगामी काळात उमेदवारी करुन निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे स्पष्ट करत काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. या बैठकीची आज हिंगोलीमध्ये चर्चा सुरु होती.

हिंगोली जिल्ह्यात खासदार राजीव सातव आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर असा काँग्रेस पक्षातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये मागील ४ वर्षापासुन सुप्त संघर्ष सुरु आहे. सातव व गोरेगावकर यांनी एकमेकांबद्दल कुठेही टिका-टिप्पणी केली नसली तरीही दोघात गटबाजी असल्याचे नेहमीच दिसुन आले आहे. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा २७ ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यात येणार असुन कळमनुरी व वसमतला जाहीर सभा ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आज २१ ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानी समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडीया, हिंगोली पीपल्स बँकेचे चेअरमन सुनील देवडा, नारायण खेडेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मागच्या चार वर्षात झालेल्या राजकारणाची उजळणी केली. यावेळी बोलतांना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी   ’आगामी काळात मीच उमेदवारी करणार’ असल्याचे सांगत पक्षांतर्गत विरोधकांना सुचक इशारा दिला. “गटबाजी आणि पक्षातील विरोधाला सामोरे जाण्यासाठी मी सक्षम आहे. तुमच्या ताकदीवर पुढची निवडणुक लढवणार” असल्याचे गोरेगावकर म्हणाले. राज्य शासनाकडे पत्र पाठवुन एखादी मागणी केली की लगेच सोशल मिडीयावर पत्र टाकले जाते, मात्र मागणी प्रत्यक्षात मंजुर झाली का हे सांगितले जात नाही, असे म्हणत त्यांनी विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर टीका केली.