
सामना प्रतिनिधी । बीड
गल्ली ते दिल्ली भाजप शिवसेनेचा गजर होत असून लोकसभेच्या निमित्ताने मोठ मोठ्या दिग्गज नेत्यांसह गावपातळीवरील नेतेही युतीत दाखल होत आहेत. यातच गेल्या अनेक वर्षांपासून वडवणी तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामेश्वर जाधव यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आ.देशमुख, बाबरी मुंडे, महादेव शेळके उपस्थित होते.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी संपर्क वाढवला असून शिवसेना भाजप उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी वेगवेगळ्या बलाढ्य गावपातळीवर नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला आहे. यातच भर म्हणून काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रामेश्वर जाधव हे काल भाजप मध्ये दाखल झाले. यावेळी ते म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात काम केले पण जिल्ह्याची परिस्थिती पाहता काँग्रेस पक्षात काही राम राहिला नाही अणि तालुका अध्यक्षांना कोणी विचारात घेत नाहीत.” यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे, लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे, आमदार आर. टी. देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून भाजप प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले.




























































