
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज जनतेसाठी पाच मोठ्या ‘गॅरंटी’ जाहीर केल्या आहेत. नओबोईचा येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना खरगे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आणि काँग्रेस सत्तेत आल्यास महिला, आरोग्य आणि भूमिपुत्रांच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. या पाच गॅरंटींच्या जोरावर काँग्रेसने आसामच्या निवडणुकीत आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महिलांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत. पक्षाने आश्वासन दिले आहे की, सत्तेत आल्यानंतर राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा ठराविक रक्कम थेट जमा केली जाईल. ही मदत कोणत्याही अटींशिवाय असेल, जेणेकरून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. यासोबतच, स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिला उद्योजकांना ५० हजार रुपयांचे विशेष आर्थिक सहाय्य देण्याची घोषणाही काँग्रेसने केली आहे. या पावलामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिला मतदारांना आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसून येत आहे.
आरोग्य क्षेत्रासाठी काँग्रेसने राजस्थान आणि कर्नाटकच्या धर्तीवर आसाममध्येही २५ लाख रुपयांचा कॅशलेस आरोग्य विमा देण्याचे वचन दिले आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. आरोग्य विम्यासह काँग्रेसने जमिनीच्या हक्काचा कळीचा मुद्दाही हाती घेतला आहे. राज्यातील सुमारे १० लाख भूमिपुत्रांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे दिले जातील, असे खरगे यांनी म्हणाले आहेत.
याव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा १२५० रुपये पेन्शन देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. “भाजपच्या योजना केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांपुरत्या मर्यादित आहेत, मात्र काँग्रेसच्या या पाच गॅरंटी प्रत्येक सर्वसामान्य नागरिकासाठी असतील,” असे खरगे यावेळी म्हणाले. आसाममध्ये ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी काँग्रेसने या घोषणा करून निवडणुकीचे वातावरण तापवले आहे. आता या गॅरंटींना आसामची जनता किती प्रतिसाद देते, हे ४ मे रोजी लागणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल.
























































