
सामना प्रतिनिधी । सोलापूर
एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडनेकूर यांची हत्या झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रेश्मा पडनेकूर यांची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह सोलापूरच्या विजयपूर परिसरात आढळून आला आहे.
गेल्या काही वर्षापासून सोलापूरचे एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख व रेश्मा यांच्यात वाद सुरु होता. तौफिक शेख यांच्याविरोधात रेश्मा यांनी 17 एप्रिल रोजी विनयभंगाची तक्रार दिली होती. काही दिवसापासून त्या बेपत्ता होत्या. काल सायंकाळी कोलार गावात त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून विजयपूर येथे शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






























































