घसा दुखत असेल तर होऊ शकतो कॅन्सर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पावसाळा सुरू झाला की अनेकांना घशाचा त्रास सुरू होतो. फक्त पावसाळाच नव्हे तर काहींना दर ऋतुबदलावेळी घशाचा त्रास होतो. साधारण ताप येण्यापूर्वी घसा खवखवतो असा समज आहे. घशाला त्रास झाला की आपण डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊन येतो. पण, जर सातत्याने घसा खवखवणं आणि घशातील ग्रंथींना सूज येत असेल तर वेळीच सावधान व्हा. कारण ही लक्षणं कॅन्सरची असू शकतात.

इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मतानुसार, घसा खवखवणं आणि ग्रंथी सूजणं ही फक्त ताप किंवा सर्दीची लक्षणं नसून थायरॉईडच्या कॅन्सरची सुद्धा असू शकतात. थायरॉईडच्या कॅन्सरचा परिणाम हा हार्मोन्स प्रसारित करणाऱ्या ग्रंथींवर होतो. या कॅन्सरची लक्षणं वेळीच लक्षात आली तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र तरीही हा कॅन्सर उपचारांनंतर पुन्हा होण्याचीही शक्यता असते.

या कर्करोगाची लक्षणं

घशाजवळील ग्रंथी सूजणं
घशाजवळ वेदनारहित गाठ जाणवणं
गळ्याचा पुढचा भाग सूजणं
सतत घसा खवखवणं
घश्याची समस्या बरी न होणं
अन्न गिळताना त्रास होणं

या लक्षणांमुळे गंभीर आजार होत नाही असा समज असल्याने अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे गंभीर परिस्थितीही उद्भवू शकते. त्यामुळे अशी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. याची पडताळणी करण्यासाठी तुम्ही रक्त तपासणी करू शकता. जेणेकरून कोणती समस्या असल्यास यामार्फत समजण्यास मदत होईल. थायरॉईड कॅन्सर हा बहुतांश वयस्कर व्यक्तींमध्ये पहायला मिळतो. शिवाय पुरुषांपेक्षा महिलांध्ये हा कॅन्सर मोठ्या प्रमाणात दिसतो. ३० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये या कॅन्सरचं प्रमाण दिसून येतं.